शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे मुख्यमंत्र्यांच्या टीकेला रोखठोक प्रत्युत्तर; म्हणाले, झेंडा कुणाचाही असो दांडा जनतेच्याच हाती; मतदारच धडा शिकवणार
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नुकतेच केलेल्या जहाल टीकेला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. अपक्ष उमेदवार तुपकर यांनी सांगितले की झेंडा कुणाचाही असला तरी त्याचा दांडा जनतेच्याच हाती , हे त्यांनी पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी आमची काळजी करू नये.परिवर्तनाचा निर्धार करणारी जनता, मतदारच त्यांना धडा शिकवणार असल्याचे सडेतोड उत्तर तुपकरांनी दिले आहे.
शेतकरी नेते तथा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना
वरील शब्दात टीकास्त्र सोडले. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ एप्रिलला बुलढाण्यात आले होते. यावेळी धाड नाक्यावरील ओंकार लॉन्स मधील कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांकडे ना झेंडा, ना अजेंडा आहे. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चितच होईल. या वक्तव्यावर विचारणा केली असता, तुपकर म्हणाले की, झेंडा कुणाचाही असो मात्र दांडा जनतेच्या हाती आहे. बुलढाण्यात मतदारांनी आपला फैसला कधीचाच करून टाकला आहे. बुलढाणा लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक असणार आहे. सामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे, त्यामुळे परिवर्तन होणार हे निश्चितच. मुख्यमंत्र्यांना माझ्या उमेदवारीमुळे बुलढाण्यात यावे लागले, बैठका घ्याव्या लागल्या असा मोठा दावा तुपकरांनी यावेळी बोलताना केला.