Amazon Ad

EXCLUSIVE पाना घरा घरात पोहचला, मशाल का नाही? अरविंद सावंतांनी बुलडाण्याच्या पदाधिकाऱ्यांना झाप झाप झापले; म्हणाले, तुम्ही दिशाभूल करून उमेदवारी मिळवली, माझ्याशी खोटे बोलले...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेचे विभागीय नेते अरविंद सावंत यांनी काल,१५ जुलै रोजी अकोल्यात घेतलेली पश्चिम विदर्भाची आढावा बैठक चांगलीच गाजली. बैठकीनंतर झालेल्या बंददाराआड चर्चेचे वृत्त आज दुपारी "बुलडाणा लाइव्ह" ने प्रकाशित करताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता त्याहीपेक्षा स्फोटक खबर "बुलडाणा लाइव्ह" कडे प्राप्त झाली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावरून अरविंद सावंत यांनी बुलडाणा जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. "रविकांत तुपकर ५० हजार मतांच्या वर जाणार नाहीत असे तुम्ही मला सांगत होतात (यावेळी श्री. सावंत आमदार नितीन देशमुख, बुधवंत यांच्याकडे पहात होते) आता पराभव त्यांच्यामुळे झाल्याचे सांगता. मशाल चिन्ह नवे होते सांगता. अपक्ष पाना घरा घरात पोहचला मग मशाल का नाही? असा सवालच अरविंद सावंत यांनी बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्याची खात्रीशीर माहिती आहे. "शिवसैनिक हा खर बोलणारा असतो, तुम्ही शिवसैनिक म्हणून जगत असाल तर जो उमेदवार निवडूण येऊ शकतो त्याला तुम्ही पुढे करायला पाहिजे होते. तुम्ही मला खोटे बोललात असेही सावंत पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले.

 अरविंद सावंत यांनी काल पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. बुलडाणा जिल्ह्याची बैठक त्यानंतर पदाधिकाऱ्यांची सावंत यांच्याशी झालेली बंददाराआड "वन टू चर्चा" चांगलीच वादळी ठरली. जाहीर बैठकीत सावंत यांच्यासोबत मंचावर संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, सहसंपर्क प्रमुख छगन मेहत्रे, वसंतराव भोजने, दत्ता पाटील उपस्थित होते. यावेळी बोलतांना अरविंद सावंत यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या परभवावरून चांगलेच झापले. उमेदवार घोषित होण्याआधी आम्हाला चिठ्ठ्या मिळत होत्या, मातोश्रीवर रक्ताने लिहिलेले पत्र आले मात्र तरीही तुम्ही दिशाभूल केली, मला फसवले अप्रत्यक्षरीत्या मातोश्री ला फसवले असे सावंत म्हणाले.
पाना घराघरात पोहचला...
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा करतांना आधी पदाधिकाऱ्यांनी मशाल चिन्ह नवे असल्याचे कारण सांगितले. त्याचा संदर्भ घेत सावंत चांगलेच फिसकले. पाना घरा घरात पोहचला मग मशाल का नाही? असा सवाल करीत सावंत यांनी बुलडाण्याच्या पदाधिकाऱ्यांना निरुत्तर केले. आता लोकसभा निवडणुकीत तुपकरांमुळे पराभव झाल्याचे सांगता विधानसभा निवडणुकीतही तेच सांगाल? असा सवालही सावंत यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले..