मेहकर, लोणार, मलकापूर वगळता जिल्ह्यात सगळीकडे महाविकास आघाडीचाच बोलबाला! लोणारमध्ये भूमिपुत्र पॅनलने सत्ता कायम राखली; चिखलीत महाविकास आघाडीला १७ जागा,
जळगाव जामोद,शेगाव मध्ये आ.कुटेंना धक्का! नांदुऱ्याची बाजार समितीही महाविकास आघाडीला
मेहकर, लोणार हा खासदार प्रतापराव जाधवांचा बालेकिल्ला समजल्या जातो. २८ एप्रिलच्या निकालात मेहकर बाजार समितीत खासदार जाधवांच्या पॅनलला ११ तर महाविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या. काल झालेल्या लोणार बाजार समितीच्या निवडणुकीत भूमिपुत्र पॅनलला १२ जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला ६ जागा मिळाल्या. दोन्ही ठिकाणच्या लढती अटीतटीच्या झाल्याचे स्वतः खासदार जाधवांनी मान्य केले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकतर्फी झाली. माजी आमदार राहुल बोंद्रेंच्या बळीराजा पॅनलने भाजपच्या सहकार पॅनलचा १७ - १ असा पराभव केला. शेगावात आमदार संजय कुटेंच्या पॅनलचा मोठा पराभव झाला, १८ पैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही.
सहकार नेते पांडुरंग पाटील आणि काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांच्या पारड्यात सर्वच्या सर्व १८ जागा पडल्या. जळगाव जामोद मध्ये प्रसेनजित पाटील यांनी आमदार कुटे आणि स्वाती वाकेकरांच्या स्थानिक आघाडीला पराभूत केले. नांदुऱ्यात आ. राजेश एकडे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने १८ पैकी १३ जागा जिंकत सत्ता ताब्यात ठेवली.
त्यामुळे काल हाती आलेल्या ५ पैकी ४ बाजार समितीचे निकाल हे महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचे समोर आले. त्याआधी २८ एप्रिलला झालेल्या निवडणुकीत देखील ५ पैकी ३ बाजार समित्या महाविकास आघाडीने काबीज केल्या. बुलडाणा, देऊळगावराजा आणि खामगावच्या बाजार समित्यांचा त्यात समावेश आहे.
मलकापूर बाजार समिती वगळता भाजपला जिल्ह्यात कुठेही समाधानकारक निकाल मिळाला नाही.