सदाभाऊ खोत गरजले! म्हणाले, कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! खामगाव तालुक्यातील "अकोली"त पार पडला पीडित शेतकऱ्यांचा मेळावा..!

 
sk
खामगाव(गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर हा गाव गाड्यांची रचना चालवणारा जगाचा पोशिंदा आहे . उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी हे समीकरण बदलले आहे. त्या विरुद्ध शेती मातीतला शेतकरी काम करताना दिसून येतोय. वाडा विरुद्ध गाव गाडा आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या लढाईत जगाचा पोशिंदा शेतकरी राजा शासनाच्या सवलती पासून वंचित राहणार नाही, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील असा शब्द महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटना आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिला. २० जूनच्या रात्री खामगाव तालुक्यातील अकोली येथे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पीडित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना सदाभाऊ बोलत होते.
 

खामगाव तालुक्यातील अकोले - लोखंडे पाळा, घारोडा या गावातील कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरच कर्जमाफी मिळवून दिली जाईल असा आश्वासक शब्द माजी कृषी राज्यमंत्र्यांनी दिला. रयत क्रांती संघटना तुमच्या कर्जमाफीच्या प्रश्नासाठी भविष्यात राज्य सरकारशी बैठक करेल. चर्चेतून प्रश्न सुटला नाही तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असेही सदाभाऊ खोत म्हणाले. शेतकरी पिकवतो तेव्हाच उभ्या जगाचे पोट भरते. मात्र तरीही काही व्यवस्था शेतकऱ्यांवर अन्याय करतात. अशावेळी व्यवस्थेच्या विरोधात लढायला शिकल पाहिजे असे सदाभाऊ म्हणाले. या मेळाव्याला रयत क्रांती पक्षाचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारिणी, जिल्हा पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.