रविकांत तुपकरांच्या नेतृत्वातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एल्गार रथयात्रा उद्यापासून! सकाळी १० ला श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन होणार प्रारंभ;

१५ दिवस चालणार रथयात्रा; उद्याचा मुक्काम काळेगावात...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रणशिंग फुंकले आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू होणारी रथयात्रा मराठा आरक्षण आंदोलनामुळे पुढे ढकलली होती, आता उद्या, ५ नोव्हेंबरपासून संत नगरी शेगावातून श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ही रथयात्रा सुरू होणार आहे. "ही रथयात्रा म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचा रणसंग्राम आहे. सर्व शेतकरी व तरुणांनी आपल्या व आपल्या मायबापाच्या न्यायहाक्काच्या लढ्यासाठी जात - धर्म आणि संघटना ,पक्ष बाजूला ठेवून शेतकरी शेतमजूर म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

सोयाबीन -कापसाला दरवाढ मिळावी, तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी,पिकविमा व शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलनाचा शंख फुंकण्यात आला आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांची मोट बांधण्यासाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात उद्यापासून एल्गार रथयात्रा प्रारंभ होणार आहे. शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन या यात्रेला सकाळी १०.०० वा. सुरुवात होणार आहे. शेगावातून प्रारंभ झाल्यानंतर यात्रा जलंब, पहुरजीरा,माक्ता, माक्ता - वाडी, घाटपुरी, जळका भडंग, पिंपळगाव राजा, निपाणा, भालेगाव, ढोरपगाव,  आणि काळेगाव असा प्रवास करणार आहे. उद्या पहिला दिवसा मुक्काम काळेगावात होईल, त्याआधी रविकांत तुपकर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत..!