१४ ऑगस्टला बुलडाण्यात सुशिक्षित बेरोजगारांचा एल्गार मोर्चा! वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार करणार मोर्चाचे नेतृत्व;

१४ ऑगस्ट ला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला जाब विचारणार आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना म्हणाले. केंद्र सरकार आणि सरकार अधून मधून नोकरभरतीच्या जाहिराती काढते मात्र त्या जाहिराती केवळ सरकारची तिजोरी भरण्याकरीता आहेत. अशा परिक्षामध्ये सुद्धा मोठा आर्थिक घोळ असल्याचा आरोप सतीश पवार यांनी केला आहे.
सरकारने शिक्षण महागडे केले, मात्र महागडे उच्चशिक्षण घेऊन सुद्धा तरुणांच्या हाताला काम नाही. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नैराश्याच्या गर्तेत आहेत. काहींनी आत्महत्या केल्या तर काही तरुण आत्महत्या करण्याच्या उंबरठयावर आहेत. हाताला काम नाही तर आता जगुन काय फायदा अशी अवस्था बेरोजगार तरुणांची झाली आहे, असे सतीश पवार म्हणाले. सरकारला आता भिडण्याची तयारी तरुणांनी केली पाहिजे. आपल्या हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी आता संघर्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आता सरकारसोबत रस्त्यावरील संघर्ष सुरू करणार आहे, त्यातीलच एक भाग म्हणून १४ ऑगस्टच्या एल्गार मोर्चाचे आयोजन असल्याचे सतीश पवार म्हणाले. १४ ऑगस्टच्या मोर्चात धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी आम्ही सरकारला निश्चीत अवधी देऊ, मात्र तेवढ्या मुदतीत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मात्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही सतीश पवार यांनी दिला आहे. जिल्हाभरातील सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या हक्कासाठी १४ ऑगस्टला एल्गार मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.