यंदा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक! संदीप शेळकेंचे लोणार येथील पत्रकार परिषदेत प्रतिपादन! म्हणाले, राजकीय पक्षही आपल्या संपर्कात...

 
लोणार
लोणार(सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणूक लढवून विजयी झाल्यास जनसेवा करणार आहे. आतापर्यंत जात - पात, धर्म पंथाच्या विषयावर निवडणुका झाल्या मात्र यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे असे प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.लोणार येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथ यात्रेच्या माध्यमातून जिल्हाभरातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. जनसेवा करण्यासाठीच ही निवडणूक आपण लढणार आहे. जिल्ह्यात विकास पर्व आणण्याचे आपले ध्येय असून त्यासाठी आपला निर्धार आहे. असे ते म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नाला उत्तर देताना शेळके म्हणाले की, सध्यस्थितीत राजकारणात काहीही होवू शकते. आपण अपक्ष म्हणून मैदानात उतरलो आहोत. राजकीय पक्षही आपल्याशी संपर्कात आहेत असा गौप्यस्फोटही यावेळी शेळके यांनी केला. मात्र कुठल्या राजकीय पक्षाचे नाव घेण्याचे मात्र त्यांनी टाळले. आपला बुलडाणा जिल्हा विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे आणि ही मागासलेपणाची ओळख पुसण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी यशस्वी झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर जनता मतदान करणार असल्याचा विश्वासही संदीप शेळके यांनी व्यक्त केला.