एकतर मोहीम थांबवा नाहीतर "त्यांना" पोट भरायला वरली मटक्याची दुकाने लावू द्या! माजी आ. हर्षवर्धन सपकाळांचा प्रशासनाला उपरोधिक टोला;

नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना भेटले! दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा..
 
 
harshvardhansapkal
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात प्रशासनाच्या वतीने    अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र या मोहिमेमुळे छोटे व्यावसायिक, फेरीवाले  यांचा रोजगार हिरावला आहे. प्रशासन गरिबांच्या पोटावर पाय देत असल्याची प्रतिक्रिया सामान्यांमधून व्यक्त होत असतानाच माजी आ. हर्षवर्धन सपकाळ फुटपाथवरील व्यावसायिकांसाठी पुढे आले आहेत. नगर पालिकेने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहिम थांबवण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी सपकाळ यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना सपकाळ यांनी नगर पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले, बुलडाणा नगरपालिकेचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे सपकाळ म्हणाले.

 नगरपालिकेने स्वतःचा भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगाने कारवाई करणे अपेक्षित असताना नगरपालिका मात्र गरिबांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. फेरीवाल्यांना सुद्धा त्यांचे अधिकार आहेत, हॉकर्स झोन जाहीर करून तिथे व्यावसायिकांना दुकाने लावण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत मात्र छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण धारक ठरवल्या जात असल्याकडे सपकाळ यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, हे सगळे २ नंबरचे धंदे अतिक्रमीत जागेत चालतात, मात्र त्यांचे अतिक्रमण काढण्याची हिम्मत प्रशासन करेल का ? असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला. सध्या सणांचे दिवस आहेत. व्यावसायिकांनी विकण्यासाठी सामान आणलेले आहे, ते त्यांना विकू द्यावे. सुरू असलेली कारवाई थांबवावी . दोन दिवसांत नगरपालिका प्रशासनाने कारवाई थांबवली नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असे सपकाळ म्हणाले. एकतर कारवाई थांबवा नाहीतर ज्यांची दुकाने काढून टाकली त्यांना उपजीविकेसाठी वरली - मटक्यांची दुकाने लावू द्या असा उपरोधिक टोला देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.