खाऊन घरची चटणी भाकर... निवडून आणू रविकांत तुपकर! बुलडाण्यातील निर्धार बैठकीत गुंजला नारा; स्वतःला उमेदवार समजून कामाला लागा; तुपकरांचे आवाहन!

मंगळवारी मॉ जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सिंदखेडराजातून करणार प्रचाराचा शुभारंभ
 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणुकीचा काळ हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांसाठी मेजवानीचा काळ असतो परंतु असे असले तरी आपण आपल्या स्वखर्चाने फिरून, आपल्या घरची चटणी भाकर खाऊन रविकांत तुपकरांचा प्रचार यावेळी करायचा आहे, असा निर्धार करत "खाऊन घरची चटणी भाकर.. निवडूण आणू रविकांत तुपकर" असा बुलंद नारा आज हजारो कार्यकर्त्यांनी दिला. रविकांत तुपकर म्हणजे तुम्ही स्वतः निवडणुकीत उभे आहात असे समजून आज पासून कामाला लागा असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले. आज ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉ साहेबांचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी जाहीर केले. ज्याप्रमाणे अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित झालात त्याचप्रमाणे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी देखील हजारॊंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन देखील यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी केले.
रत
 कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य, वंचित घटकाचे उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले रविकांत तुपकर यांच्या प्रचाराची नियोजन तसेच निर्धार बैठक आज ७ एप्रिल रोजी गोलांडे लॉन येथे पार पडली. तुमच्या स्वतःच्या खर्चाने निवडणुकीच्या नियोजन बैठकीसाठी उपस्थित राहा, अशा साध्या एका फोनवर हजारो नागरिक या बैठकीला उपस्थित झालेले दिसून आले. यावेळी सुरुवातीला काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या, प्रचाराच्या नियोजना बाबतीत काही मुद्दे यावेळी चर्चिला गेले तर काहींनी रविकांत तुपकरांच्या कामाचा उल्लेख या ठिकाणी केला. कोरोना काळात सिंगापूर मध्ये अडकून पडलेल्या एका इंजिनियर युवकाने सर्व लोकप्रतिनिधी, पुढारी पदाधिकाऱ्यांना संपर्क करूनही मला मदत मिळाली नाही परंतु तुपकरांनी दोन दिवसात मला अमेरिकेतून महाराष्ट्रात पोहोचवले असे यावेळी आवर्जून सांगत अशा माणसाला संसदेत पाठवण्याचे आवाहन केले. प्रत्येक तालुका तसेच प्रत्येक दिवस सर्कल निहाय आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील नियोजन यावेळी मांडले. आम्हाला पैशाची अपेक्षा नाही, खाण्या पिण्याची आणि गाड्या घोड्यांची देखील अपेक्षा नाही आम्ही आमच्या स्वखर्चाने गाड्या करून घरच्या भाकरी खाऊन प्रचार करू अशी ग्वाही यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी दिली.
एचडी
    यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई आहे. गेल्या बावीस वर्षाच्या आपल्या संघर्षाच्या कामाची पावती आपल्या येणाऱ्या वीस दिवसाच्या प्रयत्नातून आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे रविकांत तुपकर नाही, आपण स्वतः निवडणुकीला उभे आहोत असे समजून आतापासून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. आपणच कार्यकर्ते आहोत, आपणच नेते आहोत आणि आपणच उमेदवार आहोत आणि विजय देखील आपलाच आहे. विरोधक काहीही कुठल्याही सांगत असले तरी आपली फाईट ही महायुतीच्या उमेदवाराशीच आहे आणि आपण एक नंबर वर आहोत, त्यामुळे आता मनात कोणतीच शंका न ठेवता आणि कोणतेच कारण समोर न करता, घराघरात आपली निशाणी घेऊन पोहोचा. अर्ज भरण्याच्या दिवशी कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेने एवढा मोठा प्रचंड संख्येने जमून जी स्फूर्ती दाखवली त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपल्याकडे साधनसामुग्री कमी आहे,आपल्याकडे पैसा नाही परंतु आपल्याकडे तुमच्यासारखी हक्काची लढणारी माणसं प्रचंड मोठ्या संख्येने आहे. हीच आपली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते आता खॊटे- नाटे आरोप करत आहेत. विविध अफवा पसरवत आहेत परंतु त्यांच्या अफवांना आणि आरोपांना बळी पडू नका. जनतेने आता ही निवडणूक गांभीर्याने डोक्यावर घेतली आहे. पक्ष -जात - धर्म बाजूला ठेवून शेतकरी, कष्टकरी म्हणून सर्व जनता आता एकत्र आली आहे. मुस्लिम समाज बांधव आणि आंबेडकरी जनता देखील आपल्या सोबत आहे त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही. रविकांत तुपकर अमूक नेत्याचा माणूस आहे, तमुख नेत्याचा उमेदवार आहे असा आरोपही हे करत आहेत परंतु मी कोणत्याच पक्षाचा नाही, कोणत्याच नेत्याचा नाही, मी कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि शेवटपर्यंत राहील असे देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी ठासून सांगितले. येणारा काळ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण काळ आहे या काळात संयम ठेवा, शांत रहा, आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नका, कुणाच्याही भावना दुखतील असे बोलू नका, विरोधकांना उत्तर जरूर द्या पण चांगल्या भाषेत, अशा सूचना सुद्धा यावेळी रविकांत तुपकरांनी केल्या. ९ एप्रिल रोजी मंगळवारी सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यात जिजाऊंचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला जाईल आणि जिल्हाभर प्रचाराला सुरुवात होईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. सिंदखेडराजा येथे मा जिजाऊंचे दर्शन घेऊन विजयाचा निर्धार करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिक, तरुण महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी केले. 
 
गोपाल शिप्पलकर ठरला हिरो
गोपाल
 मोताळा तालुक्यातील गोपाल शिप्पलकर या कार्यकर्त्याच्या पत्नीने मनी मंगळसूत्र मोडून रविकांत तुपकरांना निवडणुकीसाठी आर्थिक मदत दिली आहे. तुपकरांनी ही मदत नाकारली होती परंतु या दांपत्याने शपथ दिल्यामुळे त्यांना ही रक्कम स्वीकारावी लागली. परंतु विरोधकांनी यात देखील वेगळा डाव आखला होता. पाच लाख रुपये देतो फक्त तुपकरांनी माझ्याकडू बळजबरीने मंगळसूत्र विकूण मदत घेतली असे सांग असे विरोधकांनी गोपाल शिप्पलकर यांना सांगितले परंतु या शिलेदाराने पाच लाख रुपये नाकारून मी गद्दार होणार नाही असे ठामपणे सांगितले. हा किस्सा गोपाल शिप्पलकर यांनी माइक वर येऊन सांगितलं तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याला हिरो ठरवले.