खा. प्रतापराव जाधवांनी सांगितली शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! मेहकरात २५ जानेवारीपासून ५ दिवसीय कृषी महोत्सव;जिल्हाभरातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार! २७५ स्टॉल अन् बरच काही...

 
Pj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघांचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज,१६ जानेवारीला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी सांगितली. २५ जानेवारीपासून मेहकर येथे जिल्हा स्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितली. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
 दरवर्षी शासकीय पातळीवर होणारा हा महोत्सव लोकोत्सव व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांचेही सहकार्य लाभणार आहे. मेहकर आणि लोणारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने या आयोजनासाठी पुढाकार घेणार असल्याचे खा.जाधव यांनी सांगितले. शासनाच्या शेतकरी हिताच्या अनेक योजना आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने अनेक स्टॉल त्या कृषी प्रदर्शनीत असणार आहेत. याशिवाय महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालांचेही ४० स्टॉल असणार आहेत. या कृषी प्रदर्शनीत एकूण २७५ स्टॉल असल्याची माहितीही यावेळी खा.जाधव यांनी दिली. याशिवाय पशु प्रदर्शनी सुद्धा या प्रदर्शनाचा आकर्षणाचा भाग राहणार आहे. सध्या मजुरांचा तुटवडा आहे, शेती टेक्नोसेव्ही झाली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती देणारे, मशीनींचे स्टॉल सुद्धा या प्रदर्शनीत राहणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील या कृषी महोत्सवाचा भाग राहणार असून या महोत्सवाला जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खा.प्रतापराव जाधव यांनी केले.