खा. प्रतापराव जाधवांनी केले पुण्यकर्म! पाणीप्रश्न सोडवून उतरविला माय-माऊलींच्या डोक्यावरील हंडा!
'हर घर नल 'अंतर्गत केंद्र सरकारच्या ५० टक्के हिश्श्याने ४१२३ कोटींच्या योजना केल्या पूर्ण! वाचा जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर केलेल्या भरीव कामगिरीचा लेखाजोखा..
Apr 22, 2024, 12:07 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अशुद्ध पाणी हे असंख्य आजारांचे कारण असते. शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने 'हर घर जल' या संकल्पनेतून विविध प्रकारच्या पाणीपुरवठा योजना अंमलात आणल्या. याच योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात खा. प्रतापराव जाधव यशस्वी ठरले आहेत. जिल्ह्याचा खासदार म्हणजे एक प्रकारे जिल्हावासीयांचे पालकत्व सांभाळणारा माणूस. कुटुंबप्रमुख या नात्याने प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणे, या जबाबदारीची जाणीव ठेऊन खा. प्रतापराव जाधव यांनी रोगराईला कारणीभूत असलेले अस्वच्छ व दूषित पाणी समूळ नष्ट केले. स्वच्छ व शुद्ध जल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या हर घर नल योजनेचा लाभ जिल्हावासियांना दिला. केंद्र सरकारच्या ५० टक्के वाट्यातून जिल्ह्यातील तेरा शहरे आणि १ हजार ६ गावांमध्ये तब्बल ४१२३.२४ कोटी रुपये खर्चुन घरोघरी नळ देत स्वच्छ व शद्ध पाणी उपलब्ध करून खा. जाधव यांनी आपले पालकत्व निभावले.
हर घर नल, अमृत व जलजीवनमधून पाणीप्रश्न सोडविण्यात आला. यापूर्वी जिल्ह्यातील माय-माऊलींची पाण्यासाठी फरफट होत होती. 'हर घर नल' पोहचवून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यात आला. त्याचे महिला वर्गामध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यात आला. तेराही शहरांमध्ये ५५३ कोटी रुपये खर्चुन नळयोजना पूर्णत्वास नेण्यात आली. तर शहरी भागासाठी अमृतच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत शुद्ध पाणी मिळण्यासाठी शहरी स्वच्छतेवर भर देण्यात आला. अमृत दोन योजनेवर ३५७.२८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या दोन्ही टप्प्यांमध्ये ९१०.२८ कोटी रुपयांचा निधी खा. प्रतापराव जाधव यांनी खेचून आणला. केंद्र सरकारचे ५० टक्के व राज्य शासनाचे ५० टक्के याप्रमाणे निधी वापरून योजना पूर्ण करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले. ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या मोठी आहे. महिला उन्हातान्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायच्या, त्यांची गैरसोय पाहता प्रतापराव जाधव यांनी प्राधान्याने ग्रामीण भागाला भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविला. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयांतर्गत शासनाकडून निधी आणून प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करण्यात आली.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ३६१ गावांमध्ये २२२५.९६ कोटी रुपये किमतीच्या योजना पूर्ण करण्यात आल्या. त्याचप्रमाणे ९८७ कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी खा. प्रतापराव जाधव यांनी मंजूर करून आणले. १३ शहर आणि १ हजार ६ गावांवरील पाणीटंचाईचे संकट तर दूर केलेच, शिवाय दूषित पाण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी घरोघरी उपलब्ध करून दिले. पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे पुण्यकर्म प्रतापराव जाधव यांना जनहिताची कामे करण्यास निश्चितच एक वेगळी ऊर्जा देत राहील, अशा भावना महिला वर्गांमधून व्यक्त होत आहे.