खा. प्रतापराव जाधवांनी करून दाखवलं! शेगाववासियांची दैना थांबणार! रखडलेल्या अंडरपास कामाला रेल्वे प्रशासनाची मान्यता

 
jadhao
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव येथील मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या अंडरपास कामास रेल्वे विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आलेली आहे. सदर मागणी पूर्ण करण्यात यावी यासाठी बुलडाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव हे सातत्याने केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. खासदार जाधव यांच्या सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला १५ नोव्हेंबर रोजी यश मिळाले. या संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या वतीने खासदार प्रतापराव जाधव यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे..
शेगाव येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे परिसरातील सातपुडा एज्युकेशन सोसायटी, बुरुंगले विद्यालय, ज्ञानेश्वर नगर, धनोकार नगर, शिवाजीनगर, धनगर नगर, आदी परिसरातील महिला, वृद्ध, बालक आदींना या पुलावरून ये- जा करण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. उड्डाण पुलावरून चढून परत फेऱ्याने दुसऱ्या दिशेने उतरावे लागत होते. पावसाळ्यात तर वृद्ध व बालकांची प्रचंड दैना होत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या संदर्भात खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे कैफियत मांडली. नागरिकांची अडचण पाहता खासदार जाधव यांनी यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे अंडरपास कामासंदर्भात मागणी केली होती. त्या अनुषंगाने भुसावळ रेल्वे मंडळ प्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांनी खासदार प्रतापराव जाधव, भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली व स्थळ पाहणी केली. नागरिकांच्या अडचणी समजून सांगितल्या. त्या आधारे रेल्वे विभागाच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी अम्ब्रेला योजने अंतर्गत गेट नंबर २७ जवळ अंडरपास कामास मान्यता दिली आहे. सदर अंडरपास कामामुळे नागरिकांचा चढ-उतर करण्याचा त्रास सोबत फेरा व वेळ वाचणार आहे. सदर कामासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने उर्वरित परवानगी घेऊन लवकरच कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली.आमदार डॉ. संजय कुटे यांचे लाभले सहकार्य
शेगाव येथील अंडरपास कामासंदर्भात परिसरातील नागरिकांनी आमदार डॉ.संजय कुटे यांच्याकडे देखील तक्रार केली होती. परिसरातील नागरिकांच्या अडचणी पाहता आमदार कुटे यांनी देखील खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत या विषयावर चर्चा करून शासनाकडे संयुक्तरीत्या पाठपुरावा केला. सदर विकास काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी लावून धरली होती. आमदार व खासदार यांच्या संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या मागणीला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकात उत्साहाचे वातावरण आहे.