खा. मुकुल वासनिक आज चिखलीत! कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांच्या भव्य प्रेरणास्थळाचे होणार भूमिपूजन! महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
चीखली परिसरातील विकासामध्ये शैक्षणिक क्षेत्रासह, सहकारात मोलाची भर घालणाऱ्या कर्मयोगी स्व.त्यात्यासाहेब बोंद्रे यांची आज,१२ सप्टेंबर रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या भव्य प्रेरणास्थळाचे भूमिपूजन खा.मुकुल वासनिक यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रख्यात नेत्ररोग तज्ञ व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चिखलीत अनुराधा नगरातील तपोभूमी परिसरात जिथे कर्मयोगी तात्यासाहेबांनी आयुष्यातील शेवटची २२ वर्षे वानप्रस्थाश्रमात व्यतीत केली त्या पर्णकुटी या निवासस्थानाच्या बाजूलाच प्रेरणास्थळ या भव्य स्मारकाची निर्मिती अनुराधा परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. भूमिपूजन सोहळा व महाआरोग्य शिबिराला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती रहावे, गरजू रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अनुराधा परिवाराच्या वतीने केले आहे.