खा. जाधव यांचे डॅमेज कंट्रोल यशस्वी पण ...समोर आव्हानाचा पहाड! स्थानिक स्वराज्य च्या लढती ठरणार लोकसभेची सेमिफायनल!!
पोटातील आणि डोक्यातीलही ओठावर येऊ न देणारा नेता ही खासदारांची खासियत. शिवसेनेतील महाबंडात त्यांचे विश्वासु सरदार आमदारद्वय संजय रायमूलकर व संजय गायकवाड हे परस्पर सहभागी झाले असा माहौल तयार करण्यात ते प्रारंभी यशस्वी झाले. बंडखोरांना घेऊन जाणारे विमान उडत होते तेंव्हा खासदारांच्या हाती ट्रॅक्टर चे स्टेअरिंग होते! वस्तुतः त्यांच्या हातीच जिल्ह्यातील बंडाचे सुकाणू होते हे नंतर हळूहळू स्पष्ट होत गेले. साथीदार, काय ते डोंगार, काय ते झाडी अश्या ओकेच माहौल मध्ये असताना ते दिल्लीतील ' अशोका 23' मार्गावरील शाही बंगल्यात अगदी शांत , स्थिर असल्याचे दिसून आले. ग्राम विकास समितीच्या बैठकांना फुल टाइम हजेरीही लावली. मातोश्री च्या बैठकीला हजेरी लावतानाही ते असेच वावरले. राष्ट्रपती निवडणूकच्या आसपास मात्र त्यांनी आपले 'पत्ते ओपन' केले आणि सेनेचा डाव उधळून लावला! यामागे ३ आजी माजी आमदार सोबत आणणे , २०२४ ची उमेदवारी ( आणि जमलंच तर तूर्तास केंद्राचा लालदिवा) असा व्यवहार असल्याची अफवा नंतर सुरू झाली.
मात्र यानंतरचा त्यांचा जिल्ह्यातील २२ व २३ जुलैचा दौरा मात्र फारसा यशस्वी ठरला नाय! माजी आमदार शशिकांत खेडेकर हे मधेच मुंबईत जाऊन शिंदे गटात सामील झाले. त्यांनी त्यांच्या परीने मातृतीर्थात खा. जाधवांचे स्वागत केले. पण ते जंगी, अभूतपूर्व असे नव्हते. मेहकारातील बैठक जंगी होणे यात काय नवल नव्हते. मात्र जिल्हा प्रमुख बळीराम मापारी व धाकटे बंधू मेहकरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव त्याला हजर नव्हते याचीच जास्त चर्चा झाली. चिखलीत पार पडलेली बैठक औपचारिक ठरली.
पक्षात या पद घ्या!
मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस (२७ जुलै) खासदारांची डोकेदुखी वाढविणारी बाब ठरली. धाकटे बंधू अन मापारीची वेगळी भूमिका अभेध्य गडाला तडा देणारी ठरल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे त्यांना अगदी दिल्ली पर्यंत खुलासे देण्याची पाळी आली. जिल्ह्यात विस्तार तर सोडा पण प्रतापगड मध्ये डॅमेज कंट्रोल करण्याची पाळी आली. बंधूंची मनधरणी व मापारी यांना सोबत कायम ठेवण्यात ते अखेर यशस्वी झाले. पण ठाकरेनिष्ठ गटाला मिळणारे समर्थन, घाटाखाली आणि वरही मजबुतीने एकसंघ राहिलेली शिवसेना, पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा शाखा, विभाग प्रमुख आणि हजारो सैनिकांचा निर्धार , निष्ठावानाची वाढती ताकद, सामान्याची सहानुभूती या बाबी खासदारांसमोरची आव्हाने आहेत. काँग्रेस मधून येताच अजय पारस्कर जळगावचे तालुका प्रमुख बनविले जातात यावरून शिंदे गटाचे संघटन किती मजबूत (!) आहे हे दिसून येते. शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जिल्ह्यात संघटना वाढ, विस्तार करण्याबरोबरच येत्या पालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्या निवडणुकीत संख्याबळ निर्माण करणे ही त्यांच्या समोरची खडतर आव्हाने आहेत.
हे सर्व किती जटील आहे हे त्यांना जागावाटप साठी धूर्त भाजपा सोबत होणाऱ्या बैठकात कळून चुकेल. शिवसेना पूर्ण पणे ताब्यात आणि एकसंघ असताना मागील स्थानिक स्वराज्य संस्था लढतीत सेना माघारली होती. २०१४ च्या विधानसभा लढतीत स्वबळावर लढावे लागले तेंव्हा त्यांचे पितळ उघडे पडले! खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद , चिखली मतदारसंघात उमेदवार मिळेना आणि कसेबसे उभे केले तर त्यांना मते मिळेना, डिपॉझिट वाचेना अशी हास्यास्पद कंडिशन झाली होती. यामुळे बंड /उठाव केला तरी जिल्ह्यात शिंदेशाही निर्माण करणे,त्याचा विस्तार करणे आणि स्थानिक संस्थांत किमान दुहेरी आकड्यात मेम्बर निवडून आणणे अशी एक ना अनेक आव्हाने जिल्हा संपर्क प्रमुख जाधव यांच्या समक्ष आहेत. ३ उठावकर्त्या पैकी २ फारसे कामाचे नाही अन एक मनाचा राजा आहे ही बाब देखील अनुकूल नाही. यावर कळस म्हनजे खासदार जाधव यांच्या समोरील २०२४ मधील आव्हाने तर यापेक्षा कितीतरी खडतर आहे...