आ. श्वेताताई महाले,विजयराज शिंदे,डॉ. गणेश मांटे नागपूरकडे रवाना! प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी दुपारी होणार बैठक; शिंदेंची नाराजी दूर करण्यात यश येईल का?
बुलडाणा लोकसभेची जागा भाजपला सुटावी अशी जोरदार आग्रही मागणी विजयराज शिंदे करीत होते. मात्र त्यांच्या मागणीला यश आले नाही. दरम्यान त्याचवेळी महायुतीकडून ६ विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता संवाद मेळावे पार पडले मात्र त्यात शिंदे यांना डावलण्यात आल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे. बुलडाणा येथील मेळाव्याचा विजयराज शिंदेंना निरोप होता मात्र बॅनर पोस्टर वर कुठेही शिंदे यांचा फोटो नव्हता, ना की कार्यक्रमासाठी शिंदे यांना विश्वासात घेतले. त्यामुळे विजयराज शिंदे यांच्या नाराजीत भर पडत गेली. विजयराज शिंदे हे भाजपचे लोकसभा निवडणुक प्रमुख आहेत, दोनेक वर्षांपासून ते लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत असे असतांना शिंदे यांना मुख्य प्रवाहातून दुर ठेवल्याने शिंदे समर्थकांनी थेट शिंदेंना लोकसभा निवडणुकीत अर्ज भरण्याचा आग्रह केला, त्यामुळे भाजपच्या मतदारांची सुप्त इच्छा म्हणून आपण अर्ज दाखल केल्याचे विजयराज शिंदे म्हणाले होते. दुसऱ्या दिवशी महायुतीचे उमेदवार खा.जाधव यांच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला देखील अनुपस्थित राहून आपली नाराजी शिंदेंनी दर्शवली होती.
आ. कुटेंवर नाराजी?
बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे संयोजक म्हणून भाजपच्या वतीने आ. कुटेंकडे जबाबरी होती. भाजपची अंतर्गत संघटनात्मक रचना कुटेंना अवगत होती. विजयराज शिंदे लोकसभा निवडणुक प्रमुख आहेत हे देखील कुटेंना माहीत होते. त्यामुळे विजयराज शिंदे यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी आ. कुटेंची होती. बाकी ५ विधानसभांचे सोडा पण किमान बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी तरी आ. कुटेंनी शिंदेंना विश्वासात घ्यायला हवे होते पण आ. कुटेंनी तसे का केले नाही हे त्यांचं त्यांनाच माहीत.मात्र यामुळे विजयराज शिंदे आणि त्यांचे समर्थक आ.कुटे यांच्यावर नाराज आहेत हेही तेवढेच खरे..त्यामुळेच की काय आज नागपुरात होणाऱ्या बैठकीपासून आ. कुटेंना दुर ठेवले असावे..