आ. संजय गायकवाड यांच्या पत्रावरून लावली वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी बैठक! बुलडाण्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला मिळाला बूस्टर डोस !वैद्यकीय शिक्षण मंत्री लवकरच बुलडाण्यात येऊन करणार स्थळपाहणी..

 
Uhbh
नागपूर (राजेंद्र काळे): नव्याने मान्यता देण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची सद्यस्थिती, जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरण व सामंजस्य करार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रस्ताव तथा २०२४-२५ साठी महाविद्यालय सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा.. या विषयांना घेऊन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या पत्रावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन आज,१२ डिसेंबरला करण्यात आले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिवासह राज्यातील आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी तथा विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व सामान्य रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भातील भंडारा, वाशिम व अन्य ८ ते ९ जिल्ह्यात मंजूर वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय मंत्र्यांनी त्यांच्या दालनात विशेष बैठक बोलवण्यासाठी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ८ डिसेंबर रोजी नामदार हसीन हसन मुश्रीफ यांना पत्र दिले होते. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आज मंगळवार १२ डिसेंबर रोजी नागपूर मेडिकल कॉलेजच्या प्रशासकीय दालनात वैद्यकीय मंत्री, वैद्यकीय सचिव तथा वैद्यकीय व औषध द्रव्य विभागाचे विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीत प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठीच्या समस्या त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व अधिकारी यांच्याकडून समजावून घेण्यात आल्या. 
यावेळी बुलडाणा येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी भूमिका मांडताना आ. संजय गायकवाड म्हणाले की, बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी हतेडी येथील इ क्लासची जागा जवळपास संपादित केली असून त्याचा ७/१२ सुद्धा नावावर झाला आहे. मात्र ही प्रक्रिया जलद करण्यासाठी मनुष्यबळ भरतीचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करणे जरुरीचे आहे. सलग्नित रुग्णालय हस्तांतरणाचा करार जलदगतीने व्हावा, वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपकरणे व यंत्रसामुग्री खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर करण्यात यावी, सदर संस्थेसाठी अद्यापही लेखाशीर्ष मंजूर करण्यात आलेले नाही, ते मंजूर करून सध्या केवळ अधिष्ठाता हे एकमेव पद भरलेले असल्यामुळे अन्य लिपिकवर्गीय पदाची भरती तातडीने केल्यास या वैद्यकीय महाविद्यालयाला खऱ्याअर्थाने चालना मिळेल अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली.
आ. संजय गायकवाड यांच्या या भूमिकेला ना. हसन मुश्रीफ यांनीही समर्थन देऊन तशा अर्थाचे सूचनावजा निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना याच बैठकीत देऊन प्रत्यक्ष बुलडाण्याला जाऊन घटनास्थळ पाहणी व जिल्हाधिकारी कार्यालयात लवकर एका विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे आदेशही त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले. बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीला पुन्हा बूस्टर डोस या बैठकीतून मिळाला आहे. 
या बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सवरून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील तर प्रत्यक्ष बैठकीत बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रशांत पाटील, बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कैलास झिने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, उपविभागीय कार्यकारी अभियंता राजश एकडे, प्राचार्य विनोद जाधव, आ. गायकवाड यांचे श्री सहाय्यक संतोष शिंगणे, निषाद येरमुले, अश्रुबा शेवाळे व अतुल लाहोटी यांची उपस्थिती होती.