डॉ. राजेंद्र शिंगणे अजितदादांच्या मार्गाने पुन्हा सत्तेत! माजी आमदार शशिकांत खेडेकर म्हणाले, सगळ शॉकिंग! पण... ​​​​​​​

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच दोन दिवसांआधी शरद पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावत आपण जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीसोबत असल्याचे कॅमेऱ्यासमोर सांगणाऱ्या आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही भूमिकेत बदल करून अजितदादांसोबत जायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानंतर जिल्ह्यातून त्यांना साथ देणाऱ्या खा.जाधव, आ.गायकवाड, आ. रायमुलकर, माजी आ. शशिकांत खेडेकर या मंडळींनी महाविकासआघाडी सरकार मध्ये पालकमंत्री पद भुषविणाऱ्या डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर चांगलीच आगपाखड केली होती. मात्र आता पुन्हा डॉ. शिंगणे अजितदादांना साथ देऊन सत्तेत परतल्याने त्यावर जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका काय राहील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
 

डॉ. राजेंद्र शिंगणे प्रतिनिधित्व करीत असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात माजी आ. शशिकांत खेडेकर हे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. शशिकांत खेडेकरांनी वेगवेगळ्या कारणांवरून सातत्याने डॉ.शिंगणे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्थानिक राजकारणाचा मुद्दा पुढे करूनच शशिकांत खेडेकरांनी राष्ट्रवादीसोबत युती नको म्हणत एकनाथ शिंदेंसोबत जायचा निर्णय घेतला होता. मात्र डॉ. शिंगणे अजित पवारांसोबत येऊन भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस   या युतीचे घटक झाल्याने  शशिकांत खेडेकरांची नेमकी "बुलडाणा लाइव्ह" ने जाणून घेतली.

  माजी आमदार शशिकांत खेडकर "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना म्हणाले की, "राष्ट्रवादीचे सत्तेत सहभागी होणे हे आमच्यासाठी शॉकिंग होत..मात्र आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी आमचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल." तुम्ही सातत्याने आमदार डॉ.शिंगणे यांच्यावर टीका करीत असता,आता तुमच्या विरोधाची धार बोथट होईल का? असे विचारले असता डॉ.शशिकांत खेडकर म्हणाले की" राष्ट्रवादी काँग्रेस   तेव्हा आघाडीचा धर्म निभावत नव्हती. सुरुवात त्यांनी केली होती म्हणून आम्ही उत्तर देत होतो. आता त्यांनी युतीधर्माचे पालन करायला हवे अशी अपेक्षा आहे."