काही चिंता करू नका, अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत...रविकांत तुपकरांचा मनोज जरांगेंना फोन; ॲड शर्वरी तुपकरांनी मनोज जरांगेची भेट घेऊन दिले समर्थनाचे पत्र
Sep 5, 2023, 10:19 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरागेंना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. काही चिंता करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्हाला भेटायला येता आले नाही,मात्र आजारपणातून बरे झाल्यावर तुम्हाला भेटायला येतो असे तुपकर मनोर जरांगे यांना म्हणाले. दरम्यान काल, सायंकाळी रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड शर्वरी तुपकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन समर्थनाचे पत्र जरांगे यांना दिले.
गेल्या ८ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. कालपासून त्यांनी उपोषण आणखी तीव्र केले असून आता पाण्याचाही त्याग केला आहे. रविकांत तुपकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे यांची भेट घेऊ शकले नाहीत, मात्र जरांगे यांना फोन करून तुपकर यांनी पाठींबा दर्शविला. शिवाय रविकांत तुपकर यांच्या पाठिंब्याचे पत्र ॲड शर्वरी तुपकर यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांना दिले. "मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हा सर्वतोपरी निंदनीय आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असून त्याकरिता कितीही मोठा लढा द्यावा लागला तरी तो आपण देऊ.. मनोजभाऊंच्या या संग्रामाला आमचा सक्रिय पाठींबा आहे" असे रविकांत तुपकर यांनी मनोज जरांगे यांना दिलेल्या पाठिंब्याचा पत्रात म्हटले आहे.