आमदार कुटे,आमदार फुंडकरांना पक्षशिस्त कळत नाही का? भाजपा कार्यकर्त्यांचा रोष; जिल्हा भाजपचे नेतृत्व दुसरीकडे जाऊ नये म्हणून आ. कुटेंकडून पक्षहिताला तिलांजली..?

 
बुलडाणा
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:- बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता महिन्यावर येऊन ठेपली आहे. महायुतीची उमेदवारी खा.प्रतापराव जाधवांनाच मिळण्याचे जवळपास निश्चित असले तरी अधिकृत रित्या तशी घोषणा झाली नाही. मात्र असे असले तरी प्रतापराव जाधव तयारीला लागले आहेत, मतदारसंघात महायुतीच्या बॅनर खाली कार्यकर्ता संवाद मेळावे खा.जाधव यांच्याकडून सुरू आहेत. घाटाखाली झालेल्या मेळाव्याला आ.संजय कुटे, आ.आकाश फुंडकर यांनीही संबोधित केले. मात्र या दोघांच्या भाषणांवर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचा उमेदवार अद्याप घोषित नसतांना खा.प्रतापराव जाधव बहुमताने निवडून येतील असा दावा आ.कुटे आणि आ.फुंडकर यांनी केलाच कसा? त्यांना पक्षशिस्त कळत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
दोन वर्षांपासून भाजपने या मतदारसंघावर जोरदार दावा सांगितला होता. भूपेंद्र यादव यांनी ५ ते ६ वेळा मतदारसंघाचा दौरा केला. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटावा अशी एकमुखी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ना.यादव यांच्याकडे केली होती. मात्र आता हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची आशा जवळपास मावळली आहे. जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांनी बुलडाण्याच्या जागेसाठी फारसा जोर लावला नसल्याचे आता भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अमित शहांच्या अकोला दौऱ्यात आ. संजय कुटेंनी ताकदीने बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची बाजू मांडली नाही. जिल्हा भाजपचे नेतृत्व दुसरीकडे जाऊ नये यासाठी आ.कुटे यांनी पक्षहित बाजूला ठेवल्याची चर्चा कार्यकर्त्यात आहे. त्यातच आता महायुतीच्या मेळाव्यात आ.कुटे आणि आ.आकाश फुंडकर यांच्या भाषणांचे विविध अर्थ भाजप कार्यकर्त्यांकडून लावले जात आहेत. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा असे आ.कुटे किंवा आ. फुंडकर म्हणू शकले असते मात्र विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने खा.प्रतापराव जाधव विजयी होतील असे म्हणत आ.फुंडकर यांनी खा.जाधव यांची उमेदवारीची अप्रत्यक्षरित्या घोषित केली. त्यामुळे बुलडाणा लोकसभेची जागा भाजपला सुटावी असे भाजपा कार्यकर्त्यांना वाटत असले तरी आ.फुंडकर आणि आ.कुटे खा.जाधवांच्या उमेदवारीसाठीच आग्रही असल्याचा मॅसेज भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांत गेला आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार असताना देखील नाशिकची जागा भाजपला सुटावी यासाठी नाशिकची भाजपा प्रचंड आक्रमक झाली आहे, त्या तुलनेत बुलडाण्यातून मात्र तसे होतांना दिसत नाही. एकंदरीत आ.कुटे आणि आ.फुंडकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.