चांगलाच गाजला डोणगावचा शेतकरी , शेतमजुरांचा मेळावा! संदीप शेळके म्हणाले, शेतमजूर, कामगारांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे! दिव्यांग, निराधारांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याची केली मागणी

 
Ss
डोणगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतमजूर, कामगार, भूमिहीन, निराधार, दिव्यांगांसाठी अनेक शासकीय योजना असतात. मात्र त्यांची नीट अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी थेट कृती करणारे एक 'कष्टकरी-दिव्यांग-निराधार' समन्वय केंद्र प्रत्येक तहसील कार्यालयात स्थापन केले पाहिजे, असे प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले. 
Nk
                      जाहिरात 👆
वन बुलढाणा मिशन आणि महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर रोजी दुपारी येथील आठवडी बाजार मैदानावर आयोजित शेतकरी, शेतमजूर मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे प्रमुख दिलीप गायकवाड, उपप्रदेशाध्यक्ष अशोक मानवतकर, प्रा. अनिल ढगे, गजानन मेटांगळे, विष्णू पाटील, श्रीधर सपकाळ, ओमेश काकडे, शेख मेहबूब, दिनेश अडागळे, विष्णू आखरे, शेख वसीम आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, शासनातर्फे जिल्ह्यासाठी एक विशेष अभियान राबवण्यात यावे. याद्वारे जिल्ह्यातील शेतमजूर, कामगार, भूमिहीन, दिव्यांग आणि निराधार यांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी केली पाहिजे. या प्रवर्गातील नागरिकांना तहसीलदारांकडून शासकीय ओळखपत्र दिले पाहिजे. त्याचा वापर करून शासकीय योजनांचा लाभ दिला पाहिजे. यावेळी बोलतांना महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे प्रमुख दिलीप गायकवाड यांनी शेतमजूर आणि कामगारांना रेल्वे, एसटी प्रवासात सवलत दिली पाहिजे. तसेच शेतमजूर आणि कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण, मोफत शालेय साहित्य, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जिल्हा नियोजन निधीतून दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. इतर मान्यवरांनी सुद्धा विचार मांडले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  
शेतमजूर, कामगारांसाठी अपघात, मृत्यू विमा योजना
शेतमजूर आणि कामगारांसाठी जिल्ह्यात स्वतंत्र अशी अपघात आणि अकाली मृत्यू विमा योजना सुरु केली पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील खासदार आणि सर्व आमदारांच्या निधीतून रक्कम उभारली जाऊ शकते.शेतमजूर, कामगार, निराधार आणि अपंगासाठी विशेष घरकुल योजना चालू केली पाहिजे. या वर्गातील नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात सवलतीच्या दरात आरोग्य सेवा दिली पाहिजे, अशी मागणी संदीप शेळके यांनी केली.
दिव्यांग, निराधारांसाठी पुनर्वसन केंद्र उभारावे
निराधार आणि दिव्यांग यांच्यासाठी खासगी संस्था, उद्योग जगात आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्या सहयोगातून जिल्ह्यात एक सुसज्ज असे मदत आणि पुनर्वसन केंद्र उभारले पाहिजे. यात शिक्षण, आरोग्य, रोजगार यासंदर्भांत विविध स्तरावर मदत दिली जाऊ शकते. या प्रवर्गातील जेष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यात निवारा केंद्र उभारले पाहिजे. त्यात गरजू वृद्धांना राहण्याची आणि आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था केली जाऊ शकते, असे संदीप शेळके म्हणाले.