चिखलीचे तहसीलदार उपकार करतात काय? म्हणे, जे मिळाले त्यात समाधान म्हणा...! आता मंगरूळवासियांनी घेतला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ! वाचा काय आहे नेमका प्रकार...

 
Bxnxn
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मंगरूळ वासियांनी यापुढे होणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ -२०२३ मध्ये सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची अपुरी व नियमानुसार मदत न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी याप्रकरणी तहसिलदारांची भेट घेतली, मात्र हे मिळाले त्यात समाधान माना असे उत्तर तहसीलदारांनी दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता तुम्हीच सांगा तहसीलदार काय आमच्यावर उपकार करतात का असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. मंगरूळसह अमोना येथील शेतकऱ्यांचीही हीच अडचण आहे.
एकूण क्षेत्राच्या ५० टक्के असा अहवाल शासनाने मागितला होता व त्यानुसार मदत देण्याचा निर्णय झाला होता. मात्र संबधित महसूल अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल पाठवल्याने शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळाली. इतर गावातील शेतकऱ्यांना मिळालेली मदत पाहता अपुरी मदत मिळाल्याची खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. मात्र तहसीलदारांनी यावर शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही.
   तलाठी म्हणतात मी यादी केली नाही, मंडळ अधिकारी म्हणतात मी यादी केली नाही मग यादी केली कुणी असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. याउलट तहसीलदार जे मिळाले त्यात समाधान माना असे म्हणत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत यापुढे होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन महात्मा गांधी जयंती दिनी तहसील कार्यालयाच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीच्या याद्यांची होळी केली. यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, माजी सरपंच शिंदे, माजी सरपंच शेनफड सुरुशे, पांडुरंग भोपळे, उत्तम शिंदे, उपसरपंच सुनील वायाळ, दिलीप रिंढे, पंढरीनाथ जऱ्हाड, शिवदास सुरूशे, दिलीप जाधव यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
सत्तेत असताना आंदोलन करण्याची नामुष्की.... दरम्यान शेतकऱ्यांच्या या आंदोलनात युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर अग्रभगी असल्याचे दिसले. शिवसेनेत फूट पडली तेव्हा उद्घव ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे भुतेकर काही महिन्यांनी विकासाचे कारण देऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आले. बक्षीस म्हणून आधी तालुकास्तरावर काम करणाऱ्या भुतेकर यांची युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली. मात्र जिल्ह्यात एक खासदार, दोन आमदार आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा शिवसेनेच्या या एकनिष्ठ कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे..अर्थात सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हा भुतेकर यांचा स्थायीभाव असला तरी सत्तेत असताना तशी वेळ यायला नको अशी भुतेकर यांच्या हितचिंतकांचे म्हणणे आहे.