लोकसभा लढायची की लढवून घ्यायची? मग ही बातमी तुमच्यासाठी 'मस्ट'! अर्जासाठी उमेदवारांना करावी लागते मोठी कसरत; त्यामुळे...
Mar 16, 2024, 13:52 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणूक लढविणेच नव्हे तर उमेदवारी अर्ज भरणे देखील सोपे नाही. यासाठी मोठी कसरत व भारंभार कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. यंदाच्या निवडणुकीत त्यात आणखी एका प्रमाणपत्राची भर पडलीय! आता उमेदवारांना शासकीय निवासस्थानाचे नादेय प्रमाणपत्र (नो ड्युज सर्टिफिकेट) सुद्धा सादर करावे लागणार आहे.
उमेदवारी अर्ज अचूक भरणे म्हणजे मोठी कसरत ठरते. यात थोडीही चूक म्हणजे अर्ज बाद होण्याची शक्यता राहते. यामुळे बहुतेक उमेदवार अगदी चार अर्ज सादर करतात. इच्छुकांनी एक महिन्यापासून विविध कागदपत्रे, प्रमाणपत्र संकलित करणे सुरू केले आहे. प्रस्थापित नेते, आर्थिकदृष्ट्या सक्षम इच्छुकांनी यासाठी दोन ते चार वकिलांची सेवा घेतात. माहिती कशी भरावी याच्या सूचना अर्जात देण्यात आल्या आहे. त्याचे पालन करणे, आवश्यक ठिकाणी दिनांक व स्वाक्षरी करणे, अचूक ठिकाणीच निर्धारित आकाराचेच छायाचित्र चिटकवणे व प्रस्तावकाची दिनांकीत स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. लागू असलेले सर्व भाग व रकाने भरणे बंधनकारक आहे.
लोकप्रतिनिधीना शासकीय बंगले, निवासस्थान मिळतात. अलिकडे वरिष्ठ अधिकारी लढतीत उतरण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्या उमेदवारांना अर्ज भरताना भाडे, वीज, पाणी, देयक प्रलंबित नसल्याचे अर्थात नादेय प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
हेही महत्वाचे
अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ते दुपारी ३ राहणार आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी एक तर इतर पक्ष व अपक्षासाठी १० प्रस्तावक आवश्यक आहे. २३ जानेवारी '२४ ला प्रसिध्द अंतिम मतदार यादीत त्यांची नावे असणे अनिवार्य आहे. बाहेरच्या उमेदवाराला आपल्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत जोडावी लागते. अर्जासोबत जोडावयाचे शपथपत्र आयुक्त, प्रथमश्रेणी दंडाधिकारी वा नोटरी समोर शपथबद्ध करण्याचे निर्देश आहे. पक्षाचा 'एबी फॉर्म' अर्ज भरताना किंवा अर्जाच्या अंतिम दिनांकला दुपारी ३ पर्यंत सादर करता येईल. अनामत रक्कम खुल्या प्रवर्गासाठी २५ तर अनुसूचित जाती जमातीसाठी १२ हजार ५०० असून ती रोखीनेच भरावी लागणार आहे. अर्जासोबत २ बाय २.५ सेमी आकाराचेच साध्या वेशातील छायाचित्र जोडावे लागणार आहे. उमेदवार वा प्रतिनिधीचे नावे स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक असून ते अर्ज भरण्याच्या किमान एक दिवस अगोदर काढलेले असावे. या खात्यात निवडणूक वगळता इतर व्यवहार करता येत नाही. १० हजार पेक्षा जास्तीचे व्यवहार चेक वा आरटीजीएस ने करणे अनिवार्य आहे. दैनंदिन खर्च सादर करणे व निकालापासून ३० दिवसांत अंतिम खर्च देणे आवश्यक आहे.
अपराधाची माहिती पेपर व चॅनलला देणे अनिवार्य
दरम्यान फोजदारी व सिध्ददोषी खटले असलेल्या उमेदवारांना याची माहिती जाहीर करावी लागणार आहे. शपथपत्र( नमुना २६) रकाना ५ व ६ मधील माहिती लागू असलेल्या उमेदवारांनी प्रकरणांची माहिती २ वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलवर तीनवेळा घोषणा पत्राद्वारे प्रसिद्ध करणे आयोगाने अनिवार्य केले आहे.