पूर परिस्थितीत तातडीची मदत करून नुकसानीचे पंचनामे करा ! रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कालपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुके जलमय झाले आहे. त्यातच घाटाखालील भागात विशेषतः खामगाव व शेगाव तालुक्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात नागरिकांना तातडीने मदत करावी. तसेच घरांचे व शेतीचे आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. 
रविकांत तुपकर यांनी पूर परिस्थिती बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद आहे की, ०७ जुलैपासून संपूर्ण जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा असला तरी घाटाखाली मात्र पावसाने कहर केला आहे. विशेषतः खामगाव आणि शेगाव तालुक्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसून घरांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.
अशा परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे. नागरिकांना आवश्यक ती मदत पोहोचवण्यास त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व कुणाची जीवितहानी होणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाने तातडीने कराव्या. तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करावी त्यांच्या राहण्याची व जेवणाची देखील व्यवस्था करावी. तसेच पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकांसह शेतजमिनी खरडून गेले आहेत. शेतकऱ्यांसमोर हे भले मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी शेतीचे पिकांचे नुकसान झाले व ज्या ठिकाणी घरांचे नुकसान झाले, अशा ठिकाणी पाणी ओसरताच तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.