रजा अकादमीतर्फे १२ नोव्हेंबरला जिल्हा बंद

त्रिपुरात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः त्रिपुरा राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम समुदायावर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. या निषेधार्थ बुलडाणा जिल्हा १२ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचे आवाहन रजा अकादमीने केले आहे. आज, १० नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेतून हे आवाहन करण्यात आले.
त्रिपुरा राज्यातील पाणी सागर, गोमती या जिल्ह्यात जातीयवादी संघटनांनी बांगलादेश येथे झालेल्या घटनेचे कारण पुढे करून पूर्व नियोजित पद्धतीने मुस्लिमांच्या प्रार्थना स्थळांवर हल्ले करून तोडफोड केली. आग लावण्याचे काम केले, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. प्रशासनाकडून दंगल रोखण्यासाठी कारवाई करण्यात आली नाही. उलट या घटनेविरुद्ध सोशल मीडियात आवाज उठविण्याऱ्या १०२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचाही आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. त्रिपुरा सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावावी. दंगल घडविणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करावी, यासाठी उच्चस्तरीय न्यायालयीन समिती गठित करावी, अशी मागणी रजा अकादमीने केली आहे. जिल्हावासियांनी जिल्हा बंद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मोहम्मद सिकंदर रजा कुरेशी यांनी यावेळी केले.