संदीप शेळकेंच ठरलं? २७ ऑगस्टला मनातलं सांगणार; जाहीरनामा जनतेचा अभियानाचा करणार शुभारंभ! सुप्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे घेणार प्रकट मुलाखत! लोकसभा निवडणुक लढण्याच्या मुद्द्यावर भाष्य करण्याची शक्यता!
राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण..
राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी जिल्हाभर विविध लोकोपयोगी कामे केले आहेत. जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातही शेकडो तरुणांना जागेवर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. याशिवाय महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे जिल्हाभरातील हजारो महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान या सामाजिक चळवळीला आता राजाश्रय मिळावा यासाठी संदीप शेळके यांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून "वन बुलडाणा मिशन" ही चळवळ सुरू झाली आहे. वन बुलडाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा या कार्यक्रमाचा शुभारंभ २७ ऑगस्टला होणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे धोरण या कार्यक्रमात ठरविण्यात येणार आहे, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तरुणांची, व्यावसायिकांची , शेतकऱ्यांची मते देखील या कार्यक्रमात जाणून घेण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुक लढण्याची घोषणा करणार?
संदीप शेळके सध्या कुठल्याही राजकीय पक्षात नसले तरी जिल्हाभर त्यांचा दांडगा संपर्क आहे. विविध राजकीय पक्षांच्या त्यांना ऑफर देखील आल्या असल्या तरी त्यांनी सध्या वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. मात्र लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भातील त्यांचा निर्णय जवळपास पक्का झाल्याचे सांगण्यात येत आहे. २७ ऑगस्टच्या कार्यक्रमात संदीप शेळके त्यासंदर्भातील घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमात संदीप शेळके काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.