उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बुलडाण्याच्या कार्यक्रमाला दांडी! आमदार राजेंद्र शिंगणेंची अनुपस्थितीही खटकणारी

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला आज दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सुरुवात झाली . नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री दीड तास उशिरा पोहचले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र अखेर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची अनुपस्थिती देखील खटकणारी आहे.

शासन आपल्या दारी हा शासकीय कार्यक्रम असल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे आणि मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी महाविकास आघाडीच्या रास्तारोको आंदोलनामुळे कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मात्र सत्तेत सहभागी असणारे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे का कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत याबाबत चर्चा सुरू आहे.