रविकांत तुपकरांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडेंची भेट; लाल्या सदृश्य रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ भरपाई देण्याची केली मागणी

 
Rt
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात विशेषत: घाटाखालील भागात कपाशीवर मोठ्याप्रमाणात लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी अक्षरश: कपाशीचे पीक उपटून फेकत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च आणि मेहनतीवर पाणी फेरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून आधाराची गरज आहे. त्यामुळे लाल्या सदृश्य रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
  add
              जाहिरात 
रविकांत तुपकर यांनी मुंबई मंत्रालयात भेट घेवून निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद या घाटाखालील तालुक्यांमधून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. परंतु सध्या कपाशीवर लाल्या सदृश रोग पडल्याने कपाशीची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी कपाशीचे पिक जळाले आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत तर दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांनाच दोष देऊन मोकळा झाला आहे. मोठा खर्च लावून आणि प्रचंड मेहनतीने शेतकऱ्यांनी लागवड केली परंतु लाल्या रेागामुळे त्यांच्या मेहनतीवर आणि खर्चावर पाणी फेरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून आधाराची गरज आहे. त्यामुळे लाल्या रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन अजित पवार व धनंजय मुंडे यांनी तुपकरांना दिले आहे.