ठरल...खासदार प्रतापराव जाधवांच जमणार? दिल्लीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट! केंद्रात शिवसेनेच्या दोन खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता..

 
gh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिल्लीत ४ जूनच्या रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेच्या दोन खासदारांना आता केंद्रात मंत्रिपद देण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे काल सायंकाळी पुण्यावरून दिल्लीत पोहचले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील दिवसभराचे कार्यक्रम आटोपून सायंकाळी दिल्लीत पोहचले. दोन्ही नेत्यांनी रात्री १० वाजता गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. अमित शहांनी राज्यातील मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड मागवले. वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विषयावर देखील बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे राज्यात काही नव्या चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

खासदार जाधवांना संधी..?

बुलडाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव शिवसेनेचे वजनदार नेते आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेतेपदी देखील नियुक्ती केली आहे. याशिवाय केंद्रातल्या महत्वाच्या समित्यांवर काम करण्याचाही त्यांना अनुभव आहे. त्यामुळे प्रतापराव जाधवांना कॅबिनेट तर आणखी एका खासदारांना राज्यमंत्री पद मिळेल असे शिवसेनेच्या गोटातून कळते.