वन बुलडाणा मिशनच्या रोहीणखेडच्या सभेत उसळली गर्दी! व्यापाऱ्यांना भक्कम पाठबळ देणार असल्याचा संदीप शेळकेंचा शब्द; म्हणाले राजकीय इच्छाशक्ती अभावी जिल्ह्याचा विकास रखडला...
Nov 7, 2023, 09:13 IST
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रोहिणखेड येथील शंभरावर व्यापारी साडीचा व्यवसाय करतात. सुरत, अमदाबाद येथून साड्या आणतात. त्यांना साडी व्यवसायातील माहिती आहे. राजकीय इच्छाशक्ती असती तर याठिकाणी साडी फॅक्टरी उभी राहिली असती. येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांना भक्कम पाठबळ देऊ, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील संवाद मेळाव्याला रोहिणखेड येथून रविवारी ५ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, रोहिणखेडला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. हजार वर्षे जुन्या वास्तू इथे आहेत. कौमी एकतेची ही भूमी आहे. सर्वधर्म समभाव जपणारी ही भूमी आहे. वैभवशाली इतिहास असलेल्या या गावातील नागरिकांशी संवाद साधतांना मनाला आनंद झाला. सुरुवातीला गावातून रॅली काढण्यात आली. रॅलीत प्रचंड संख्येने नागरिक सहभागी झाले होते. बच्चे कंपनीचा उत्साह सुद्धा पाहण्यासारखा होता.
परिवर्तनाचे साक्षीदार व्हा..!
वन बुलढाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ आहे. जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करतो आहोत. आपल्या पाठबळामुळे मला भविष्यातील आशादायी चित्र दिसत आहे. येणाऱ्या काळातील परिवर्तनाचे आपण साक्षीदार व्हावे, असे आवाहन संदीपदादा शेळके यांनी केले. तसेच उपस्थित ग्रामस्थांची जिल्ह्याच्या विकासाबाबत असलेली मते जाणून घेतली.
बुलढाण्याचा विकास का होऊ शकत नाही?
कोल्हापुरात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा वारसा तेथील लोकप्रतिनिधींनी जपला. विकासात तो जिल्हा आघाडीवर आहे. बारामती, पुणे, सातारा, सांगलीचा विकास झाला. मग आपल्या बुलडाणा जिल्ह्याचा का होऊ शकत नाही..? आपल्या जिल्ह्याला तर राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा आहे. आतापर्यंत राजकीय इच्छाशक्ती इच्छाशक्ती अभावी जिल्ह्याचा विकास रखडल्याचे ते म्हणाले. विकासासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. आपण साथ दिल्यास नक्कीच कायापालट होईल, असा विश्वास संदीप शेळके यांनी यावेळी व्यक्त केला.