मतमोजणी अपडेट! शिकले तेवढे हुकले रे भो! तब्बल ८७३५ मते बाद; लिहायचं होता अंक मात्र कुणी केले टिकमार्क तर कुणी मारली फुली; सुशिक्षितांना धड मतदान करता येईना..!

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर संघाची निवडणूक ३० जानेवारीला पार पडली. २ लाख ६ हजार १७२ मतदारापैकी १ लाख २ हजार ४०३ पदवीधर मतदारांनी मतदान केले.
आज, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या या वर्गाला धड मतदान सुद्धा नीट करता आले नसल्याचे मतमोजणीवरून समोर आले आहे.

 मतदान केंद्रावर मिळणाऱ्या मतपत्रिकेवर तिथेच मिळणाऱ्या अधिकृत पेनाने उमेदवाराच्या नावासमोर इंग्रजीत किंवा रोमन  अंकात पसंतीक्रम लिहायचा होता. असे मतदान केले तरच ते वैध ठरवण्यात येते. मात्र काहींनी अक्षरात एक, दोन असे लिहून मतदान केले. काही पदवीधरांनी उमेदवाराच्या नावासमोर टिकमार्क केले तर काहींनी ज्या उमेदवाराला पसंती द्यायची नाही त्यासमोर फुली अर्थात क्रॉसचे चिन्ह लिहिल्याने ती मते बाद म्हणजेच अवैध ठरवण्यात आली. काही मतदारांनी मतपत्रिकेवर एकच मिशन ,जुनी पेन्शन असेही लिहिले, त्यामुळे ती मतेही बाद करण्यात आली. त्यामुळे तब्बल ८ हजार ७३५  एवढ्या पदवीधरांना धड मतदान नीट करता आले नाही.

त्यामुळे धडपड करून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करूनही एवढ्यांचे मतदान वाया गेले आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ८७३५ मते बाद ठरल्याने विजयासाठी ४६ हजार ९२७ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. धिरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची ४३ हजार ३४३ तर रणजित पाटलांना ४१००५ मते मिळाली आहेत. कुणीही आवश्यक कोटा पूर्ण न केल्याने आता दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागत आहेत.