गोडसेंवरील चित्रपट जिल्ह्यात प्रदर्शित होऊ देणार नाही काँग्रेस!; जिल्हाध्यक्ष बोंद्रेंचा इशारा

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसेंच्या आयुष्यावरील चित्रपट बुलडाणा जिल्ह्यात प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्णय जिल्हा काँग्रेसने घेतला आहे. महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तीकरण कदापी खपवून घेणार नाही, असा इशाराच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिला आहे.
श्री. बोंद्रे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना नथुराम गोडसेच्या भूमिकेत पाहणे त्यांच्या चाहत्यांना देखील आवडणारे नाही. एका खुन्याच्या उदात्तीकरणाच्या प्रयत्नाचा सर्वांनीच निषेध करायला हवा. नथुराम गोडसेला नायक बनवण्याचा हा प्रयत्न चुकीचा पायंडा पाडणारा आहे. कुणीही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, असे बोंद्रे म्‍हणाले आहेत. गांधींचे विचार जगातील मानवजातीला चिरंतन प्रेरणा देणारे असून, त्‍यांनी देशासाठी दिलेले बलिदान जनता विसरलेली नाही व विसरणारही नाही, असेही बोंद्रे म्‍हणाल्याचे काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्लोकानंद डांगे यांनी कळविले आहे.