काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके म्हणाल्या,शासन आपल्या दारी उपक्रमाचा फार्स थांबवा!

लोकं शासकीय कार्यालयात चकरा मारताहेत अन् अधिकारी कार्यक्रमाच्या तयारीत गुंतलेत...

 
Js
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागतील, असे भासवले जात आहे. मात्र हा निव्वळ फार्स असून तो थांबवावा, अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत. त्याकडे लक्ष देण्याऐवजी अधिकारी, कर्मचारी शासन आपल्या दारी योजनेच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे लोकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. दुसरीकडे शासन आपल्या दारी उपक्रमाद्वारे नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही, एकाच छताखाली नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जातील, असे सांगितल्या जात आहे. हा विरोधाभास नाही का..? 
दैनंदिन जीवन जगतांना नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. वेळीच तिथल्या तिथे त्यांच्या समस्या निकाली काढता येऊ शकतात. त्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम घेण्याची काय गरज आहे.? शासनाच्या पैशाची ही उधळपट्टी नव्हे का?, जनतेच्या प्रश्नांची सरकारला इतक्या उशिरा का आठवण झाली? असा सवाल जयश्रीताई शेळके यांनी उपस्थित केला आहे. सरकारचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे असल्याचे यावरुन स्पष्ट दिसते. अशा सरकारला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.