Amazon Ad

बुलडाण्यात काँग्रेस आक्रमक! केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर चिखल फेकला, पुतळा जाळला!

सरकारविरोधी घोषणांनी जयस्तंभ चौक दणाणला; राहुल बोंद्रे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जनता महायुती सरकारला चिखल फासेल...
 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने चिखलफेक आंदोलन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर चिखल फेकला त्यानंतर पुतळ्याचे दहनही करण्यात आले. सरकारविरोधी घोषणांनी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक दणाणला होता. केंद्रातले आणि राज्यातले सरकार महा भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील सरकार आहे. जनतेच्या सुखदुःखाशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही. देशातली ,राज्यातली सर्वसामान्य जनता अनेक समस्यांनी अडचणीत असताना सरकार मात्र सत्तेच्या मस्तीत धुंद आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेचा असंतोष दिसला. थोड्याफार फरकाने ते पुन्हा सत्तेत आले असले तरी केंद्रातले सरकार जास्त काळ टिकणार नाही. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची मस्ती उतरवून जनता त्यांना चिखल फासल्याशिवाय सोडणार नाही असा घणाघात यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलतांना केला.

   संपूर्ण राज्यभर काँग्रेसच्या वतीने चिखलफेक आंदोलन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात देखील काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर चिखल फेकून पुतळा जाळण्यात आला. गांधी लढे ते गोरों से हम लढेंगे चोरोसे यासह विविध घोषणा काँग्रेस कार्यकर्ते देत होते. शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी अडचणीत सापडला आहे. मात्र सरकारने गेल्या वर्षीच्या पीक विम्याची रक्कम अद्याप दिली नाही. पिकांना भाव नाही, कवडीमोल भावात शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे.विद्यार्थी अडचणीत आहे, नोकऱ्या नाहीत. परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. पोलीस भरती चिखलात पावसात सुरू आहे.
शेतकरी अडचणीत, पावसाची वाट पीक विम्याची रक्कम मिळाली नाही..हे सरकार महाभ्रष्टाचारी आहे..पोलीस भरती पावसात, चिखलात सुरू आहे. सरकारच्या धोरणांना जनता वैतागली असून विधानसभा निवडणुकीत सरकारची मस्ती उतरल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही असे यावेळी राहुल बोंद्रे म्हणाले.