काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंना पितृशोक! कर्मयोगी त्यात्यासाहेब बोंद्रेंनी ८२ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास! सकाळी साडेआठला निधन; सायंकाळी ५ वाजता होणार अंत्यविधी!

आमदार श्वेताताईंनी दिला शेवटच्या भेटीच्या आठवणींना उजाळा..

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे वडील कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचे  आज,२४ फेब्रुवारीला सकाळी साडेआठला निधन झाले. मृत्युसमयी ते ८२ वर्षांचे होते. 

 १२ सप्टेंबर १९४१ ला जन्मलेल्या तात्यासाहेब उर्फ सिद्धिविनायक बोंद्रेचे अनुराधा परिवाराच्या उभारणीत मोठे योगदान आहे. चिखली शहरात अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय उभारण्यासाठी तात्यासाहेबांनी परिश्रम घेतले. अध्यात्मिक क्षेत्रात त्यांना विशेष रुची होती. त्यामुळे धान्य - साधना करण्यासाठी ते अनुराधा महाविद्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या पर्णकुटी परिसरात राहत होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजारी होते. १२ सप्टेंबर २०२२ ला त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आज, सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. तात्यासाहेबांच्या इच्छेनुसार त्यांचा अंत्यविधी अनुराधा महाविद्यालय परिसरातील पर्णकुटी परिसरात आज सायंकाळी ५ वाजता ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव दुपारी साडेबारा ते साडेचार पर्यंत पर्णकुटी परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
    
आ. श्वेताताईंनी व्यक्त केल्या संवेदना..!

   तात्यासाहेब बोंद्रे यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "आदरणीय तात्यासाहेबांनी चिखली शहरात शैक्षणिक नंदनवन उभारले. तात्यासाहेबांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय होते. संपूर्ण अनुराधा परिवार हा त्यात्यासाहेबांच्या परिश्रमातून आणि संघर्षातून उभा राहिलेला आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आदरणीय तात्यासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यात्यासाहेबांनी आशीर्वाद दिले होते. चिखली शहरातील सन्माननीय आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. आदरणीय तात्यासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली! बोंद्रे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत " अशा शब्दात आमदार श्वेताताईंनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.