वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या; रविकांत तुपकरांची उपवनसंरक्षकांकडे मागणी
Mar 28, 2023, 09:35 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, सोबतच वन्यप्राण्यांनी देखील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ शेतकऱ्यांना अदा करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वनविभागाचे उपवन संरक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. सोबतच वन्यप्राण्यांमुळे देखील जिल्ह्यात दरवर्षी पिकांचे प्रचंड नुकसान होते. प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानाची वन विभागाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते, मात्र गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच नाही. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन भरपाई मंजूर झाली आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर रक्कम जमा झाली नाही. यावर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्यातच वन्यप्राण्यांनी यंदाही मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे वनविभागाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. ३१ मार्चपर्यंत सदर मंजूर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा आक्रमक आंदोलन करु, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.