जिल्ह्यात लवकरच कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारणार; बचतगटांच्या विक्री केंद्राचे बांधकामही लवकर पूर्ण करून घेणार! खासदार प्रतापराव जाधवांचा शब्द!

 म्हणाले, बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार; चिखली आणि शेगावात महिला बचत गटांचा उद्योजक मेळावा संपन्न ; शेगावात ६०० महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अनुदान वाटप,९०५ बचत गटांना निर्धुर शेगडीचे वाटप..
 
 
ghjk

चिखली/शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेत फेडतात. कर्ज त्या कधीही बुडवत नाहीत. मात्र घेतलेल्या पैशातून जो उद्योग उभा करतात त्याचे उत्पादन दर्जेदार असूनही महिला बचत गटांच्या मालाला विक्री व्यवस्था व विपणन प्रणाली नसल्यामुळे महिलांचे उद्योग बंद पडतात किंवा विस्कळीत होतात. मात्र आता या समस्येवर आपण तोडगा काढला आहे. जिल्ह्यात यापूर्वी भूमिपूजन झालेल्या तालुकापातळीवरील विक्री केंद्राचे बांधकाम दिवाळी पर्यंत पूर्ण होईल तसेच महीलांसाठी लवकरच ६० लाख रुपये किंमतीचे कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारणार असल्याचा मानस खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. काल, शेगाव येथे  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गट उद्योजक मेळावा पार पडला यावेळी अध्यक्षस्थानावरून खा.जाधव बोलत होते. त्याआधी चिखली येथील मौनीबाबा संस्थान येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विपणन मार्गदर्शन मेळावा देखील खा.प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात देखील खा.जाधव यांनी महिला बचत गटांच्या कामाचे कौतुक करीत दिवाळीच्या आधी विक्री केंद्र आणि ६० लाख रुपयांचे कॉमन फॅसिलिटी सेंटर लवकरच सुरू करणार असल्याचा शब्द दिला...

शेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ९०५ बचत निर्धुर शेगडी वाटप करण्यात आले तसेच ६०० महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना खा.जाधव यांनी उमेद अभियानामार्फत मंजूर निधीतून करता येणारे व्यवसाय, पुढील नियोजन व बचत गटांनी  उत्पादन व उत्पन्न कसे वाढवावे याविषयावर मार्गदर्शन केले. बचत गट समुहांनी तयार केलेल्या मालाला विक्रीसाठी आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध  करून तो माल ॲमेझॉन फ्लिपकार्ट च्या माध्यमातून कसा विकला जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही खा.प्रतापराव जाधव म्हणाले. जिल्ह्यातील बचत गट समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी जिल्हा पातळीवर मॉल उभारण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. उत्पादित मालाचा जिल्हा पातळीवर एकच ब्रँड ही संकल्पना अस्तित्वात आणणार असल्याचेही ते म्हणाले.  बचत गटाच्या महिलांना उद्योग,व्यवसाय विषयक अडचणी येऊ नये म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उपजीविका मदत कक्षा मार्फत केल्याचेही खा.प्रतापराव जाधव म्हणाले.