अयोध्या दौऱ्यातही आ. संजय कुटे पुढे पुढे करतांना दिसले! मतदारसंघात फिरायची जबाबदारी अपर्णाताईंवर! कुटेंच्या डोक्यात चाललय तरी काय?

 
yogi
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मिळेल मिळेल म्हणता म्हणता आ.संजय कुटेंना मंत्रीपदापासून दूरच रहावे लागले. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन होऊन ९ महिन्यांचा कालावधी उलटला मात्र कुटेंच्या मंत्रिपदाचा मेळ काही जमला नाही. ज्या गुलाबराव पाटलांना  शिंदे - फडणवीसांनी बुलडाणा जिल्हावासियांच्या माथी मारले ते पाटील काही जिल्ह्यात फिरकायला तयार नाहीत. जिल्हा अतिवृष्टीने झोडपला, त्यानंतर आता अवकाळी पावसामुळे धुमाकूळ घातला,हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र गुलाबराव पाटलांना त्याचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे जिल्ह्यातल्या एखाद्याला तरी मंत्रिपद मिळाले असते तरी बरे वाटले असते.. बर ते जाऊद्या..मुद्दा तो नाही..मुद्दा आहे  जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटेंचा.! त्यांच्या मतदारसंघात सध्या आमदार कुटे कुठे आहेत असाच प्रश्न लोक विचारतात असतात, कारण ते हल्ली टिव्हीवर जास्त दिसतात अन् मतदारसंघात फिरतात त्या आमदार कुटेंच्या अर्धांगिनी अपर्णाताई कुटे..!
 

संजय कुटे तसे देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचे समजले जातात.(खरच आहेत की नुसता दिखावा,त्यांचं त्यांनाच ठाऊक) राज्यात जेव्हा सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होत्या तेव्हा फडणवीसांनी कुटेंवर विशेष जबाबदारी सोपवली होती. शिंदे गटाच्या उठावखोर आमदारांना सुरत आणि गुवाहाटीत कशाचीही कमतरता पडायला नको यासोबतच फडणवीस आणि शिंदे व उठावखोर आमदारांमध्ये संदेशवाहक म्हणून कुटे जबाबदारी पार पाडत होते. अर्थात सोपवलेली जबाबदारी कुटेंनी व्यवस्थितरित्या पार पाडली. भाजपमध्ये एव्हढे आमदार असताना कुटेंवर एवढी मोठी जबाबदारी फडणवीसांनी सोपवली होती,त्यामुळे  कुटेंना त्याचे बक्षीस मिळेलच असे वाटत होते. मात्र कुटेंची निराशा झाली, कारण फडणवीसांना जवळच्या लोकांपेक्षा बाहेरच्यांना खुश करायचे होते. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी त्यांना संधी मिळेल असे वाटू लागले होते,मात्र अजून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काही निघाला नाही..बर ते जाऊद्या..मुळात मुद्दा तो आहे  आमदार कुटेंच्या अयोध्या दौऱ्याचा..!
    
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी जवळीक..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या टीमसह अयोध्या दौऱ्यावर गेले होते. शिंदेंचा हा दौरा चांगलाच गाजला. शिंदेंच्या शिवसेनेचे जवळपास सर्वच आमदार या दौऱ्यात सहभागी होते. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस देखील अयोध्येत पोहचले. दरम्यान, भाजपचे राज्यात १०५ आमदार असताना काही मोजके आमदार,मंत्री या दौऱ्यात सहभागी झाल्याचा दिसले.या दौऱ्याचे बऱ्याच माध्यमांनी लाइव्ह कव्हरेज दाखवले. त्यात आमदार संजय कुटे सातत्याने पुढे पुढे करतांना दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी देखील आता आ.कुटेंची चांगलीच जवळीक निर्माण झाल्याचे दिसत आहे. यदाकदाचित पुढे मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय आलाच तर मुख्यमंत्री शिंदे देखील आपल्याबद्दल पॉझिटिव्ह असावेत असे आ.कुटेंना वाटू शकते.
     
मतदारसंघातही दिसा हो संजुभाऊ...!
   
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ २००४ मध्ये संजय कुटेंनी कृष्णराव इंगळे यांच्या हातून हिसकावला. तेव्हापासून तर आतापर्यंत कुटेंना या मतदारसंघात कुणीही पराभूत करू शकले नाही. तब्बल ४ निवडणुका ते मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेत. कुटेंच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये असलेली इच्छुकांची मोठी संख्या आणि त्यांचीतील अंतर्गत स्पर्धाच कुटेंचा विजय सोपा करते असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आता येणारी निवडून आमदार कुटेंसाठी ५ वी आणि आव्हानात्मक असणार आहे. प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना त्यांना करावा लागू शकतो. आधीचे आमदार कुटे आणि आताचे आमदार कुटे यात आता बराच बदल झाल्याचे सामान्य मतदारांनी बोलून दाखवले. आधी आमदार कुटे सातत्याने मतदारसंघात फिरतांना दिसायचे आता मात्र ते फारसे फिरत नाही. मतदारसंघात असले तरी त्यांचा बहुतांश वेळ "विश्रांती" घेण्यातच जातो. सांत्वन भेटी, लग्न सोहळे, सामाजिक कार्यक्रम यालाही आता त्यांच्या अर्धांगिनी अपर्णाताईच जास्त हजेरी लावतात. त्यामुळे आमदार कुटे आता अपर्णाताईंना विधानसभेच्या रिंगणात तर उतरवणार नाही ना अशीची चर्चा जोर धरू लागलीय. तसे झाले तर आमदार कुटे कुठे असतील?  त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू हाय...विधानपरिषद, लोकसभा की दुसरेच काहीतरी..सोडा विषय..तर विषय असा आहे की संजुभाऊ तुम्ही आधीच्या  संजुभाऊसारखेच रहा अन् टिव्हीवर दिसण्यापेक्षा मतदारसंघात दिसा असं आता जळगाव जामोद मतदारसंघातील सामान्य लोकांचं म्हणंन हाय..