आ. महाले पाटील यांची चिखलीतील काँग्रेसच्या आंदोलनावर टीका!

म्‍हणाल्या, 'सल्ला केंद्राला गल्ला मात्र राज्याला..!'

 
श्वेताताई महाले

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ केली. मात्र ही वाढ अति होत असल्याने केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर लावण्यात आलेला अधिभार कमी करून थोडा फार का होईना दिलासा दिला. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्या. मात्र राज्य शासनाने लावलेला अधिभार अजूनही कमी न केल्याने जनता पेट्रोल, डिझेलच्या भडक्यात होरपळून निघत असल्याने राज्य शासनाने राज्याचा पेट्रोल, डिझेल वरील अधिभार कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली. आज चिखलीत निघालेल्या काँग्रेसचे जनजागरण अभियान म्हणजे "सल्ला केंद्राला गल्ला मात्र राज्याला' अशी टीकाही त्यांनी केली.
 

प्रसिद्धी पत्रकात आ. महाले पाटील यांनी म्हटले आहे, की मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश यासह इतर राज्यांत तेथील राज्य सरकारांनी पेट्रोल, डिझेलवरील त्यांच्या राज्याचा कर कमी केल्याने महराष्ट्राच्या तुलनेत त्या राज्यात जवळपास १५ रुपयांनी पेट्रोल व डिझेल स्वस्त झालेले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर देशात सर्वाधिक आहे. राज्याचा सुमारे १४ टक्के महसूल पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करातून येतो. पेट्रोल ५.७० ते ६.३५ रुपये तर डिझेल ११.१६ ते १२.८८ रुपयांनी स्वस्त होईल मात्र महाराष्ट्र शासनाने अजूनही त्यांचा कर कमी न केल्याने राज्यातील जनतेला दररोज वाढत्या किंमतीचा फटका बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागण्याचा इशारा सुद्धा त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या अंती दिला आहे.