राजपूत समाजाच्या सन्मानासाठी आ. श्वेताताई मैदानात! विधानसभेत उठवला आवाज! म्हणाल्या, भामटा नको, "हे" पर्यायी शब्द वापरा! समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन्याचीही मागणी!
या चर्चेत भाग घेतांना आ. श्वेताताई महाले यांनी राजपूत समाजाचा तेजस्वी इतिहास सभागृहासमोर मांडला. राज्यातील राजपूत हा समाज वीर, लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो, महाराणा प्रतापसिंह आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा समाज देशाच्या रक्षणासाठी लढत असल्याचा इतिहास आहे असे त्या म्हणाल्या.
लढवय्या राजपूतांनी परकीयांशी दिली निकराची झूंज
शूरवीर असलेल्या राजपूत समाजाने मुगल, निजाम यांच्यासह खिलजीविरुध्द लढाया केल्या. त्याच प्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध सुद्धा आपले रक्त सांडले. राजपूत योध्यांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडल्याचा ही इतिहास असल्याची आठवण आ. महाले यांनी सभागृहात करून दिली.
ब्रिटीशांनी केली शूर राजपूतांची बदनामी..
ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध या समाजाने लढा दिल्याने ब्रिटिशांनी या लढवय्या जातीच्या लोकांवर लूट पाट, खून , दरोडे असे कलमे लावून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी तयार करून राजपूत ऐवजी भामटा राजपुत असे लेखी पुरावे तयार करून या लढवय्या जातीला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला असल्याचे त्या म्हणाल्या. तेच शासकिय रेकॉर्ड आज तागायत कायम आहे, त्यामुळे "भामटा" हा शब्द शिवी सारखा असल्याने या शब्दामुळे या जातीतील लोकांमध्ये हीन भावना निर्माण होत असल्याने राजपूत "भामटा" या जातीतील " भामटा " या शब्दाऐवजी राजपूत अ , ब , क अशा पद्धतीचा संबोधन करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी आज सभागृहात केली.
राजपूत समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा - आ. श्वेताताई महाले
सामाजिक न्याय विषयावरील चर्चेत सहभागी होतांना आ. श्वेताताई महाले यांनी राजपूत समाजाच्या अस्मितेबरोबरच आर्थिक विकासाचा मुद्दा देखील शासनासमोर उपस्थित केला. यावर्षी भाजपा शिवसेनेच्या युती सरकारचे अर्थ मंत्री उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय्य देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. वडार , गुरव , रामोशी , धनगर या समाजासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली याचा संदर्भ त्यांनी आपल्या भाषणातून दिला. त्यांच्या साठी कोट्यावधी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु, राज्यात राजपूत आणि राजपुत पोट जातींची संख्या फार मोठया प्रमाणात आहे. हा समाज अत्यंत मेहनती असल्याने कुणासमोर हात फैलावत नाही . राजपुत ही लढवय्या जात असुन त्यांनी मोठमोठ्या राज सत्ते समोर आपल्या शुरतेचे प्रदर्शन केलेलें आहे. नव्हे राजपूतांशिवाय या देशाचा इतिहास पूर्ण होणारच नाही. त्या राजपुत समाज आजही शासकिय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी धडपडत असतो. त्यांना जातीचे प्रमाण पत्र मिळविण्यासाठी फार मोठया अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना फार पूर्वीचे पुरावे मागितल्या जातात. यासाठी राजपुत भामटा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देताना शासनाने थोडे लवचिक धोरण ठरविणे गरजेचे आहे असे आ. महाले म्हणाल्या.
या सोबतच राजपुत जातीमधील बहुतांश जाती या भटक्या विमुक्त जमातीमध्ये मोडतात. आजही राजपुत समाजाची आर्थिक स्थिती ही अत्यंत हालाखीची असल्याने ईतर जातीसाठी स्थापन केलेल्या आर्थिक महामंडळाच्या धर्तीवर राजपुत समाजासाठी हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी आग्रही मागणी आ. श्वेताताई महाले यांनी या चर्चेत सहभागी होतांना राज्य शासनाकडे केली.