आ. धीरज लिंगाडे घेणार प्रशासकीय राजवटीत बुलडाणा शहरात झालेल्या कामांची झाडाझडती! जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुख्याधिकारी आणि आ. लिंगाडे आमने - सामने; लिंगाडेंचे आव्हान नेमके कुणाला?
बुलडाणा नगरपालिकेत प्रशासक म्हणून सध्या गणेश पांडे काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्वच विकासकामांची झाडाझडती आमदार लिंगाडे घेणार आहेत. ३१ मार्चला आमदार लिंगाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. शहर व्यवस्थापनाबद्दल सखोल चर्चा करण्यासाठी प्रशासक पांडे यांच्यासोबत बैठक लावण्याचे त्यांनी सूचित केले होते.त्यानुसार आज १२ एप्रिलला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. बुलडाणा शहरात प्रशासकीय काळात झालेल्या पाईपलाईन, साफसफाईचा तपशील, बेकायदेशीर होर्डिंग, शहरातील पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था आदी बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
आव्हान मुख्याधिकाऱ्यांना की आमदार गायकवाडांना?
दरम्यान जिल्ह्यात अशा पद्धतीची पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीतून नेमके काय बाहेर येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. आमदार लिंगाडे यांनी शहरात झालेल्या कामानसंदर्भात प्रशासक पांडे यांच्यासोबत बैठक लावली असली तरी पांडेंच्या कार्यकाळात त्यांना "भरीव" पाठबळ देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्याशीच टक्कर घेण्याची तयारी आमदार लिंगाडे यांनी सुरू केल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे