BREAKING बुलढाण्यात आचारसंहितेचा भंग; भरारी पथकाने केली कारवाई! सरकारी तलावाचे सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन फलक हटविले! पाहा व्हिडिओ...
Mar 26, 2024, 15:29 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून संपूर्ण राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्चपासून आचारसंहिता जारी केली. यावेळी राजकीय पक्षांचा उल्लेख करणारे बॅनर प्रशासनाकडून हटविण्यात येतात. मात्र बुलडाणा नगर परिषदेच्या हद्दीतील सरकारी तलाव येथील सौंदर्यीकरण भूमिपूजनाचे फलक जैसे थे होते! याबाबत निवडणूक विभागाला आज २६ मार्च मंगळवार रोजी ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली, त्यानुसार भरारी पथकाने अवघ्या चार मिनिटात सरकारी तलावाचे ठिकाण गाठले आणि सौंदर्यीकरण भूमिपूजनाचे फलक हटविले. भरारी पथक क्रमांक १ चे फिरते निरीक्षक एस. एस. पिंपरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तर एकीकडे आचारसंहीतेचा भंग होत असल्याचे दिसून आले आहे. जे फलक काढण्यात आले, त्यामध्ये शिवसेना भाजपा पक्षाचा उल्लेख असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, यांचासह आ. संजय गायकवाड , खा. जाधव यांचे चित्र होते. तर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शब्द उल्लेख होता. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भरारी पथकाने वरिष्ठ स्तरावर ऑनलाइन पद्धतीने अहवाल पाठवला आहे. यामुळे आता कुणावर कार्यवाही केल्या जाते? याकडे लक्ष लागले आहे.