चिखलीच्या मोठ्या नेत्याचा होणार भाजप प्रवेश.. अन् तेही विधानसभा डोळ्यासमोर ठेवून? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने चर्चांना उधाण! काय आहे नेमका प्रकार वाचा...

 
Ggv
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्ली राजकारणात कधी काय होईल याचा नेम राहिला नाही.. अमका नेता सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात अशी स्थिती आहे. पक्षाची विचारधारा, मूल्याधिष्ठित राजकारण हे शब्द फक्त भाषणात बोलण्यापुरते उरलेत. पैशातून राजकारण, राजकारणातून पैसा अन कमवलेला पैसा टिकवण्यासाठी वाटेल ती तडजोड करायची..मतदान करणारी जनता जाऊद्या खड्ड्यात.. ही "अपवाद वगळता" अनेक नेत्यांची काम करायची तऱ्हा झालीय..त्यामुळे लोकांचा राजकीय पक्षावरील, नेत्यांवरील विश्वास आता ढळत चाललाय..गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच राजकारण गढूळ झाल्याचं अनेक जण बोलून दाखवतात..! बर असो..मुद्दा आहे तो चिखलीच्या राजकारणाचा..भूकंप हा शब्द आता काही राजकरणात नवीन राहिला नाही..जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीला तर असे राजकीय भूकंपाचे छोटे मोठे हादरे अधून मधून बसत असतात..मात्र आता लवकरच मोठा भूकंप चिखलीच्या राजकारणात होणार असल्याची चर्चा रंगली आहे..अर्थात तशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आली आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. "चिखलीचा एक मोठा नेता लवकरच भाजपात प्रवेश करणार..वेध विधानसभेचे" अशी ती पोस्ट होती.!
हल्लीचे राजकारण बघितले तर कोणत्याही शक्यता नाकारता येत नाहीत हे सुध्दा खरेच आहे. चिखलीच्या राजकारणाचा विचार केला तर विद्यमान आमदार श्वेताताई महाले आणि माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याभोवती इथले राजकारण फिरत असते. शिवसेनेतून काँग्रेस आणि काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले "निष्ठावान" नरेंद्र खेडेकरही चिखलीचेच..मात्र खासदार जाधव शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानंतर खेडेकर स्वतःला जिल्ह्याचे नेते समजून थेट लोकसभेची स्वप्ने रंगवू लागलेत..अर्थात राजकारणात सगळ्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार आहे, त्यामुळे खेडेकरांनी ती बघितली तर त्यात काही गैर नाही..बर ते जाऊद्या, विधानसभेचे वेध लागून कोण बरे भाजपात प्रवेश करणार? हाच सध्याचा चर्चेचा मुद्दा आहे..
  सध्या भाजपच्या श्वेताताई आमदार आहेत. त्यामुळे २०२४ ला देखील त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आमदारकीची साडेतीन वर्षे त्यांनी चांगलीच गाजवली आहे, आक्रमक महिला आमदार म्हणून महाराष्ट्रात त्यांनी ओळख मिळवली आहे,शिवाय कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणला आहे. त्यामुळे त्यांना डावलून इथे दुसरा उमेदवार देण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे हे सगळ माहीत असताना असा कोणता मोठा नेता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपात प्रवेश करू शकतो?
   व्हायरल पोस्टमध्ये "मोठा नेता" असा उल्लेख आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता काँग्रेसमध्ये राहुल बोंद्रे यांच्याव्यतिरिक्त मोठा चेहरा दिसत नाही. कुणाल बोंद्रे हे सुद्धा काँगेसकडे आहेत,मात्र वर्षाआधीच ते भाजपातून काँग्रेसवासी झालेत त्यामुळे लगेच ते भाजपात परतण्याची शक्यता नसल्यात आहे. नरेंद्र खेडकर जिथे आहेत तिथे सुखी आहेत, राहुल बोंद्रे तर जिल्हाध्यक्ष आहेत आणि इतर छोटे मोठे नेते असले तरी ते थेट विधानसभा डोळ्यासमोर ठेवतील असे नाहीत. त्यामुळे संबधित पोस्ट वाचणाऱ्यांच्या डोक्याला विचार करून पार मुंग्या लागल्यात...
डॉ.शिंगणे अजित दादांसोबत जाऊ शकतात तर....
  जिल्हा बँकेच्या उद्धाराचे कारण सांगून सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. शिंगणे अजितदादा पवारांच्या गोटात जाण्याच्या वाटेवर आहेत. पवार साहेबांवर अपार श्रद्धा असणारे डॉ. शिंगणे अजित दांदासोबत जाणारच नाहीत, निष्ठा शिकावी ती शिंगणे साहेबांकडून अस जिल्ह्यात बोलल्या जात होत मात्र असं बोलणारे आता तोंडावर पडले आहेत..त्यामुळे चिखलीतील कुण्या मोठ्या नेत्याने "काही वाचवण्यासाठी" भाजपची वाट धरली तर नवल वाटायला नको..महत्वाचे: आत्ता कळलेल्या माहितीनुसार ज्या पोस्टमुळे चिखलीत राजकीय चर्चांना उधाण आले, ती पोस्ट पोस्टकर्त्यांने आपण गंमत म्हणून टाकल्याचे सांगीतले..जाऊद्या नका टेन्शन घेऊ..!!