खा.प्रतापराव जाधवांच्या विजयाच्या प्लॅनिंगसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्ह्यात! शेगावात घेणार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांनी धूमधडाक्यात प्रचार सुरू केला आहे. महायुतीचे सहाही आमदार त्यांच्या प्रचारासाठी आपापल्या मतदारसंघात जोर लावत आहेत. आता स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून खा.जाधव यांच्या विजयाचे मायक्रोप्लॅनिंग करण्यासाठी ते उद्या १३ एप्रिलला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. संत नगरी शेगावात मुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
उद्या,१३ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता शेगाव शहरातील देशमुख मंगल कार्यालयात महायुतीची आढावा बैठक होईल. खा.जाधव यांच्या प्रचाराचे नियोजन, आगामी होणाऱ्या स्टार प्रचारकांच्या सभा, बूथ वरील नियोजन, गावागावांत होणाऱ्या छोट्या कॉर्नर बैठका आदी गोष्टींचा आढावा मुख्यमंत्री शिंदे घेणार आहेत. या बैठकीला आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.संजय कुटे, आ.संजय रायमूलकर, आ.आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले, आ.संजय गायकवाड उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन खा.प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.