मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्ह्यात! पण... राडा होण्याची शक्यता; सकल मराठा समाज कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत...

 
jdkslw

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या,३ सप्टेंबर रोजी बुलडाण्यात येणार आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ३० हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष तर ७५ हजार लाभार्थ्यांना बँक खात्याद्वारे लाभ देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. बुलडाणा शहर पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र आता ऐनवेळी पुन्हा या कार्यक्रमात विघ्न येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आतापर्यंत तब्बल ४ ते ५ वेळा या कार्यक्रमाच्या तारखा आणि स्थळात बदल करण्यात आला आहे. आधी लोणार, नंतर मेहकर आणि शेवटी बुलडाण्याचे ठिकाण या कार्यक्रमासाठी निश्चीत करण्यात आले. प्रशासनाने या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे.मात्र उद्या मुख्यमंत्री शिंदे बुलडाण्यात आले तर राडा होईल अशी चिन्हे आहेत. जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. त्याचा निषेध मराठा समाजाकडून होण्याची शक्यता आहे.

  मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर सकल मराठा समाज बहिष्कार करण्याची शक्यता आहे, असे झाले तर कार्यक्रमाच्या उपस्थितीवर परिणाम होऊ शकतो. शिवाय मध्येच मुख्यमंत्र्यांना सकल मराठा समाजाच्या निदर्शनांचा रोषाचा सामना करावा लागू शकतो. एकंदरीत अचानक ओढवलेल्या या प्रकारामुळे उद्या पोलिसांना आणखी तगडा पोलीस बंदोबस्त वाढवावा लागणार आहे.