सिंदखेडराजा परिसरात अवकाळीचे थैमान! वन बुलडाणा मिशनचे संदीप शेळके शेतकऱ्यांच्या बांधावर; पीक नुकसानीची पाहणी करुन शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला. शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. सिंदखेड राजा तालुक्यात अवकाळीने प्रचंड नुकसान झाले. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी सोमवारी सकाळी या परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नुकसानाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला असून शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. 
Ss
२६ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर धो- धो पडत राहीला. या पावसाने सिंदखेडराजा परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. संदीपदादा शेळके यांनी असोला, पळसखेड चक्का, बोराखेडी बावरा तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावांत थेट बांधापर्यंत जाऊन पाहणी केली. या नुकसानीचे पंचनामा करून राज्य सरकार तुटपुंजे सानुग्रह अनुदान देईल. एवढ्याशा मदतीने शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पुसता योग्य प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. 
वन बुलडाणा मिशनचा मदतीचा हात 
असोला येथील ग्रामकल्याण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे शेडनेटमध्ये ठेवलेले सोयाबीन सीड पावसाने भिजले. तर वादळी वाऱ्यामुळे याच गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. टिनपत्रे उडाल्याने शेतकऱ्यांच्या घरातील कापूस भिजला. किराणा सुद्धा भिजला. त्यामुळे असोला येथील वन बुलडाणा मिशनच्या कार्यकर्त्यांनी काही घरात किराणा सामान किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.  
पळसखेड चक्का येथे शेडनेटचे प्रचंड नुकसान
पळसखेड चक्का या एका गावात शेडनेट लावलेले जवळपास १०० शेतकरी आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेडनेटमध्ये लावलेले टोमॅटो, वांगी, मिरची आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेडनेट उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. राज्य, केंद्र सरकार शेडनेटला नुकसान भरपाई देत नाही. पाच- दहा हजारांचे सानुग्रह अनुदान देऊन जमणार नाही. शेतकऱ्यांना तत्काळ योग्य प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी संदीप शेळके यांनी केली.