3 तालुक्यांमुळे हुकली जिल्ह्याची सेंच्युरी! 8 सदस्यांनी मतदान केलेच नाही!! 97.82% मतदान

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अत्यंत धीम्या सुरुवातीनंतर "हमी' मिळाल्यावर नंतर धो धो मतदान झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात टक्केवारीने अखेर 97. 82 टक्केचा आकडा गाठला! तीन तालुक्यांमुळे जिल्ह्याची मतदानाची सेंच्युरी हुकली असून, 8 सदस्यांनी आज शेवटपर्यंत मतदानच न केल्याने 100 टक्के मतदानाचा विक्रम थोडक्यात हुकला!!  एकूण 367 पैकी 359 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
आज, 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 दरम्यान 11 केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. मतदानाचा वेग क्रमाक्रमाने वाढत गेला. मतदान 100 टक्केचा जादूई आकडा गाठेल, असा माहौल असताना 3 तालुक्यांमुळे जिल्ह्याची सेंच्युरी हुकली! बुलडाणा केंद्रावरील 1, शेगावमधील 2 तर मलकापूरमधील 5 मतदारांचे मतदान अज्ञात कारणावरून हुकले. या तुलनेत चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद या 8 केंद्रांवर मतदानाने शंभरी गाठली!  जिल्ह्यात एकूण स्थानिक प्राधिकारी पुरुष मतदार 169  व स्त्री मतदार 198 आहेत. पैकी 165 पुरूष मतदारांनी, तर 194 स्त्री मतदारांनी मतदान केले आहे.