शेतकरी आंदोलनाला परवानगी नाकारून मोदी सरकारने लोकशाही पायदळी तुडवली ! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा हल्लाबोल;
चिखली कॉग्रेसने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत स्व.शुभकरणसिंहला वाहीली श्रध्दांजली
Feb 28, 2024, 14:54 IST
चिखली (ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशातील जनतेसह शेतक-यांवर आश्र्वासनांचा पाउस पाडीत सत्तेत विराजमान झालेल्या भाजपाच्या मोदी सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणुन दिल्ली येथे पंजाब व हरीयाणा राज्यातील शेतक-यांना आंदोलनाची परवानगी नाकारून जुल्मी पध्दतीने शेतक-यांवर अत्याचार करून लोकशाही पायदळी तुडविल्याचा आरोप करीत कॉग्रेसच्या वतीने बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत मोदी सरकारचा निषेध केला आहे. मोदी सरकारच्या अत्याचारामुळे हकनाक बळी गेलेल्या तरूण शेतकरी स्व. शुभकरणसिंह यास सामुहिक श्रध्दांजली अर्पण केली आहे.
चिखली कॉग्रेसच्या वतीने काल, २७ फेब्रुवारी रोजी बस स्थानक परीसरात दिल्ली येथे शेतकरी आंदोलनावर अत्याचार करणा-या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहीजे, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करा, सोयाबीन कापसाचा भाव पाडणाऱ्या मोदी सरकारचे कारायचे काय, मोदी हटाव देश बचाव अशा घोषणांनी परीसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी बोलतांना राहुल बोंद्रे पुढे म्हणाले की, शेतमालाला हमी भाव मिळावा या रास्त मागणीकरीता दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या पंजाब व हरीयाणा येथील शेतक-यांना केंद्र सरकारने पोलीस बळाचा वापर करून सिमेवरच रोखुन धरले आहे. शेतक-यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर, गोळीबार, करण्यात येत आहेत. या गोळीबारात भटींडा येथील २१ वर्षीय शेतकरी शुभकरणसिंह याचा दुर्देवी मुत्यू झाला. हे आंदोलन अमानुषपणे चिरडण्याचा केंद्र सरकारचा आघोरी प्रयत्न सुरू आहे. या आंदोलनात शेतमालाला हमी भाव देण्यात यावा, डॉ. स्वामीनाथन आयोग लागु करण्यात यावा, शेतकरी व शेत मजुरांचे कर्ज माफ करून त्यांना पेंशन देण्यात यावी, भुसंपादन कायदा २०१३ लागु करण्यात यावा, मुक्त व्यापार करारावर बंदी घालावी, शेतकरी आंदोलनात मुत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना भरपाई आणि नोकऱ्या देण्यात याव्यात, बनावट बि बियाणे, खते, किटकनाषक, विकणाऱ्या कंपन्या विरूध्द कठोर कायदे करण्यात यावे या व इतर रास्त मागण्याकरीता पंजाब व हरीयाणा येथील शेतकरी जिवाची पर्वा न करता दिल्ली येथे भाजपाच्या केंद्रातील सरकार विरोधात उभा ठाकला आहे. बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीने या आंदोलनाला पाठींबा जाहीर करून शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढयात पाठीशी असल्याचे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले. योवळी कॉग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिका-यांची समयोचित भाषणे झाली.
कर्यक्रमासाठी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या समवेत तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, कॉग्रेसचे शहर कार्याध्यक्ष निलेश अंजनकर, माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, ज्ञानेश्वर सुरूशे, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, महिला कॉग्रेसच्या विजयताई खडसन, श्रीमती प्रमिलाताई जाधव, युवक कॉग्रेसचे रिक्की काकडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.