बुलडाणा लोकसभेची जागा आपलीच! जोमाने तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश! म्हणाले, गद्दारांना धडा शिकवायचाय!

मातोश्रीवर पार पडली बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक; नरेंद्र खेडेकरांनी सांगितलं बैठकीत काय काय झालं...
 
Sivsena
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची विधानसभा निहाय आढावा बैठक काल,२२ ऑगस्टच्या दुपारी मातोश्रीवर पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही बैठक घेतली. जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरांसह बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रनिहाय प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायचाय हे धान्यात ठेवून तयारीला लागा. "इंडिया" आघाडीत राहून शिवसेना लोकसभा निवडणुक लढणार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची जागा मित्रपक्षांना सोडण्याचा विषयच नाही. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे,सातत्याने या मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकतोय त्यामुळे या जागेवर शिवसेनेचाच अधिकार आहे, त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत देखील आपलाच उमेदवार विजयी होईल असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह भरला. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या सडेतोड भूमिकेमुळे बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकू पाहणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
 हिंदुत्वाचे कारण सांगून खा. प्रतापराव जाधवांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले होते. १ खासदार आणि जिल्ह्यातील २ आमदार शिंदेसोबत गेले तरी जिल्ह्यातील मुळ शिवसेनेवर मोठा परिणाम झाला नाही. चिखलीत झालेली उद्धव ठाकरेंची सभा कमालीची यशस्वी झाली होती. त्याआधी आदित्य ठाकरे यांनी मेहकरात जाऊन मोठी सभा घेत खा.जाधव आणि आमदार रायमुलकरांना आव्हान दिले होते. त्यामुळे २०२४ ची लोकसभा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनच लढल्या जाईल असे कयास बांधण्यात येत होते. मात्र त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील संधी मिळेल तेव्हा तेव्हा बुलडाणा लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा असा हेका धरला होता. मात्र आता त्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. इंडिया आघाडीत राहूनच लोकसभा निवडणुका लढणार असलो तरी बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर आपलाच अधिकार आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरांनी सांगितले.
  बूथ बांधा..आता आपल ठरलय..!
काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत का याचीही विचारपूस उद्धव ठाकरे यांनी दिली. आता गावागावांतील बूथ सशक्त करा, कार्यकर्त्यांना कामाचे नियोजन करा, पदाधिकाऱ्यांनी दौऱ्यांचे नियोजन करा. लोकसभा निवडणुक आपणच लढवणार आहोत, आपल्याशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे हे ध्यानात ठेवून तयारीला लागा असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. काल, दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक जवळपास २ तास चालल्याचे नरेंद्र खेडेकरांनी सांगितले.