रविकांत तुपकरांच्या लाठीचार्ज, आत्मदहन आंदोलन, तुरूंगवासामुळे बुलढाणा जिल्ह्याला मिळाले होते ५१७ कोटी! एल्गार मोर्चाचा दणका बसला अन् शेतकर्‍यांच्या खात्यात आले अग्रिम पीकविम्यापोटी १८ कोटी रूपये!

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळाले २२० कोटी रूपये! 

 
Nbv
बुलढाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र वृत्तसेवा):  शेतकर्‍यांसाठी जीवाचे रान करून लढणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामुळेच शेतकर्‍यांच्या पदरात सरकारला दोन पैसे टाकावे लागले. तुपकरांनी मुंबईत आत्मदहन आंदोलनाची हाक दिली, गनिमीकाव्याने मुंबई गाठली अन् सरकार हादरले. तुपकरांशी चर्चा करून शेतकर्‍यांच्या खात्यात तब्बल ५१७ कोटी रूपये तातडीने टाकले. एवढेच नाही तर बुलढाण्यातील भव्य अशा एल्गार मोर्चानंतर हादरलेल्या सरकारने अग्रिम पीकविम्यापोटी तातडीने १८ कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले. सोयाबीन, कापूस, येलो मोझॅक बोंडअळीने केलेले नुकसान, पावसाचा खंड पडलेल्या झालेले शेतीपिकांचे नुकसान, अतिवृष्टी व अवकाळी पावसाने केलेले नुकसान व त्याची भरपाई देण्यास सरकार व पीकविमा कंपन्यांनी टाळाटाळ केली, तेव्हा तुपकरांनीच जीवावर उदार होऊन आंदोलने केलीत, वेळप्रसंगी तुरूंगात गेले, परिणामी सरकारला तुपकरांपुढे झुकावे लागले, व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी लागली.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी तुपकरांनी विधिमंडळावर धडक दिली. त्यांच्या दणक्यामुळेच सरकारला २२० कोटी ३४ लाख रूपयांची मदत तब्बल २.६७ लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर टाकावी लागली. तुपकर लढले म्हणून शेतकर्‍यांना पैसे मिळू शकलेत. त्यामुळेच आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना, गावखेड्यातील शेतकऱ्यांमध्ये तुपकरांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

  जिल्हाभरात प्रचारादरम्यान जोरदार लाट निर्माण करण्यात  तुपकर यशस्वी ठरलेत. ही लाट तुपकरांना आता लोकसभेत पाठवेल का? याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. शेतकर्‍यांसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून, लेकराबाळांना वार्‍यावर सोडून लढणार्‍या या तरूण शेतकरी नेत्याचं भवितव्य आज बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक मायबाप मतदारांच्या हातात आहे. हे मतदार तुपकरांच्या कष्टाचे फळ त्यांना देतात की नाही, यावर जिल्ह्यातील शेतकरी चळवळीचे भवितव्य अवलंबून आहे.

सोयाबीन-कापूस, पीकविमा व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यातील नेत्यांनी तोंड उघडले नसताना, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकर्‍यांसाठी आत्मदहन करण्यास सज्ज झाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांचे आंदोलन मोडित काढून त्यांच्यासह ५० जणांना अन्यायकारक पद्धतीने अटक केली होती. तसेच, त्यांना तुरुंगात डांबले होते. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या हक्काचा भाव, नुकसानभरपाई, पीकविम्याचा प्रश्न या सगळ्यांची मागणी मार्गी लावण्यासाठी तुपकरांनी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे राज्य सरकारला तुपकरांना चर्चेला बोलवावे लागले, व सुरूवातीला ५१७ कोटी रूपये, व नंतरच्या आंदोलनानंतर १८ कोटी रूपये शेतकर्‍यांना द्यावे लागले. यानिमित्त झालेल्या आंदोलनातून तुपकर व त्यांच्या सहकार्‍यांवर ३०७, ३५३, दंगल, प्रॉपर्टी डॅमेज यासारखी अनेक गंभीर कलमे लावण्यात आली. त्यांच्या कुटुंबालाही त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, ज्या दिवशी तुपकर हे अकोल्यातील तुरूंगात डांबले गेले, त्याच दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा झाली. एकूण ५१७ कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रविकांत तुपकर नको असलेल्यांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना वर्षभरासाठी अटक होईल, असे षडयंत्र रचण्याचा डाव आखल्याचा आरोप तुपकर समर्थक करीत होते. परंतु, न्यायदेवतेने हा डाव उधळून लावला, परिणामी आज तुपकर हे लोकसभेच्या मैदानात उभे राहू शकले. आता त्यांच्या कष्टाला फळ देण्याचे शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत तरूण, मायबहिणींच्या हातात आहे. तुपकरांच्या २२ वर्षांतील संघर्षाची मजुरी म्हणून जिल्ह्यातील मतदारांनी द्यावी असे आवाहन वारंवार तुपकर करीत होते.  आता या संघर्षाला कितपत यश येते हे ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतर समोर येईल..