BULDANA LIVE SUNDAY SPECIAL मेहकर- लोणार भाजपात गटबाजीला उधाण! एकाच वेळी झाल्या "सुपर १००" पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठकी; संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष डॉ. मांटेही वाट चुकले?

हे म्हणे आम्ही खरे.. ते म्हणे आम्ही खरे.! वाचा नेमके काय आहे प्रकरण?
 
Vxvx
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद तशी फारशी नाही..खासदार जाधव,आमदार संजय रायमुलकर मित्रपक्ष असलेल्या भाजपला गांभीर्याने घेत नाहीत. "सब माल अपने डिब्बे में" याप्रमाणे सत्तेचा जो काही वाटा मिळेल तो शिवसेनेलाच हे मेहकर -लोणार मध्ये ठरलेलंच..यामुळेच की काय मेहकर - लोणार मधील जे काय भाजपचे पदाधिकारी आहेत ते कायम अस्वस्थ असतात.आपली अस्वस्थता ते जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर टाकतही असतील कदाचित पण आम्ही तुमच्यात नाक खुपसत नाही,तुम्हीपण आमच्यात नाक खुपसू नका असे जिल्हा प्रदेश भाजपच्या वरिष्ठांना खडे बोल सुनावले जात असावे शिवसेनेकडून..त्यामुळे होत काय की, जिल्ह्यात इतरत्र ज्या गतीने भाजपचे संघटन वाढतांना दिसते तसे ते मेहकर - लोणार मध्ये वाढतांना दिसत नाही.. त्यातही आहे तेवढ्या भाजपमध्येही गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे..पदाधिकाऱ्यांचे एकमेकांशी पटत नाही, जुळत नाही..त्याचा परिणाम दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिसून आला. भाजपच्या महाविजय २०२४ या अभियानाअंतर्गत मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघातील सुपर १०० पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन बैठका पार पडल्या. संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, लोकसभा क्षेत्र प्रमुख विजयराज शिंदे, मलकापुरचे माजी आमदार चैनसुख संचेती वृदांवन लॉन मध्ये पार पडलेल्या बैठकीला उपस्थित होते. याच वेळी सुपर १०० पदाधिकाऱ्यांची एक बैठक एमईएस हायस्कूल मध्ये पार पडली. जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ यांच्यासह स्थानिक भाजपचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान पक्षाला अभिप्रेत असलेली बैठक आमचीच होती, प्रदेश कार्यालयाला ज्या सुपर १०० पदाधिकाऱ्यांची यादी आम्ही दिलेली आहे ते पदाधिकारी एमईएस हायस्कूल मधील बैठकीला उपस्थित असल्याचा दावा मंदाकीनी कंकाळ यांनी केला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत दोनदा जिल्ह्यात येऊन गेले. "महाविजय २०२४" साकारण्यासाठी जे जे आवश्यक ते ते करतांना भाजप दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून "सुपर १००" पदाधिकाऱ्यांची योजना करण्यात आली आहे. या १०० पदाधिकाऱ्यांच्या खांद्यांवर त्या त्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राहणार आहे. मेहकर - लोणार विधानसभा मतदारसंघातील सुपर १०० पदाधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसाआधी आयोजित करण्यात आली होती. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुपर १०० पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दोन्ही बैठकांची वेळ एकच असल्याने संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर आणि जिल्हाध्यक्ष डॉ. मांटे एकाच बैठकीला उपस्थित राहू शकले.
खरी बैठक कोणती? खरे सुपर १०० पदाधिकारी कोणते?
दरम्यान यासंदर्भात बुलडाणा लाइव्ह ने एमईएस हायस्कूल मध्ये झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. "एमईएस हायस्कूल मध्ये झालेली बैठक पक्षाची अधिकृत बैठक होती. आम्हाला पक्षाने बैठक घ्यायचे आदेश दिले होते, त्याआधी आम्ही प्रदेश कार्यालयात सुपर १०० पदाधिकाऱ्यांची यादी दिली आहे. त्या यादीतील पदाधिकारी एमईएस हायस्कूल मध्ये झालेल्या बैठकीत सहभागी होते. दुसरीकडे झालेली बैठक नव्हतीच तर तो मेळावा होता, बैठकीला अपेक्षित असलेले लोक तिथे नव्हते त्याऐवजी एका एका गावातून माणसे भरून आणली होती, पक्ष संघटनेला ते अभिप्रेत नव्हते. यात जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांच्या दोष नव्हता, त्यांची दिशाभूल करण्यात आली." असे त्या म्हणाल्या. दिशाभूल कुणी केली त्याचा आम्ही शोध घेतोय असेही मंदाकिनी कंकाळ म्हणाल्या. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. एकंदरीत मेहकर -लोणार भाजपातील खरे सुपर १०० पदाधिकारी कोणते? संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर , जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे बैठकीची वाट चुकले काय असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशीच गटबाजी कायम राहिली तर "महाविजय २०२४" साकारल्या जाईल का याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.